News Update :

जयप्रकाश नारायण व प्रभावतीदेवी यांचे ‘जयप्रभा’ गावातील सुंदर स्मारक

जयप्रकाश नारायण व प्रभावतीदेवी यांचे ‘जयप्रभा’ गावातील सुंदर स्मारक
जयप्रभा
उत्तरप्रदेशातील हे एक गाव आहे. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले. स्वर्गीय नानाजी देशमुख यांच्या प्रतिभेतून साकार झालेले. ‘जयप्रभा’ हे स्व. नानाजींनी दिलेले नाव आहे. ‘जय’ म्हणजे जयप्रकाश नारायण आणि ‘प्रभा’ म्हणजे प्रभावतीदेवी, जयप्रकाशजींच्या सहधर्मचारिणी. जयप्रकाशजी एका काळी कट्टर संघविरोधी होते. नानाजी देशमुखांशी त्यांचा संपर्क आला आणि त्यांना संघ काय तो कळला. पूर्वग्रहांचे ओझे वागविणारे जयप्रकाशजी नसल्यामुळे, त्यांनी आपली मते बदलविली.नानाजी देशमुखांनी, राजकारण सोडल्यानंतर, प्रथम उ. प्र.च्या गोंडा जिल्ह्याकडे आपले लक्ष वळविले. गाव स्वस्थ आणि स्वायत्त असावे, अशी त्यांची कल्पना होती. या कल्पनेचा विस्तारित साक्षात्कार चित्रकूट आणि त्याच्या परिसरात पाहावयास मिळेल. पण त्याचा पहिला नमुना ‘जयप्रभा’ गावाने प्रस्तुत केला.शिक्षणाच्या दृष्टीने २५ जुलै १९८१ ला म्हणजे गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर एका शाळेची येथे स्थापना करण्यात आली. शिशुमंदिरापासून सुरवात झाली. प्रथम ५० मुले व १५ मुली एवढीच संख्या होती. आता त्या विद्यालयाचे रूपांतर एका इंटरकॉलेजपर्यंत म्हणजे आपल्याकडील १२ वी पर्यंत झाले आहे.केवळ पुस्तकी ज्ञान देणे एवढेच मर्यादित उद्दिष्ट या विद्यालयासमोर नाही. गाव स्वावलंबी बनावे, हे त्याचे उद्दिष्ट होते. त्यानुसार शिलाई, नर्सरी, विद्युत्-यांत्रिकी (इलेक्ट्रिशयन), रिफिल तयार करणे या शिवाय संगणकाचेही शिक्षण येथे दिले जाते.१९८१ मध्येच येथे ‘आरोग्यधाम’ची स्थापना झाली. हा भाग हिमालयाच्या पायथ्याशी असल्यामुळे औषधिगुणयुक्त जडीबुटींचे येथे भांडार उपलब्ध आहे. ९० प्रकारच्या औषधिवनस्पतींची एक आदर्श वाटिका येथे तयार करण्यात आली आहे. त्यापासून ३२ प्रकारची औषधे तयार केली जातात. या औषधांच्या उपयोगासाठी ‘आजीबाईचा बटवा’ प्रचलित करण्यात आला आहे. सुमारे २५ गावांची निवड करण्यात आली असून, त्या प्रत्येक गावात एकेक प्रशिक्षित कार्यकर्ता सेवारत आहे. तो प्रत्येक गावात, औषधिवाटिका तयार करतो. त्यापासून तयार करण्यात आलेल्या ३२ औषधांचा एक बटवा (किट) असतो. ग्रामीण भागात आढळणार्‍या रोगांपासून बचाव करणे आणि क्रमाक्रमाने गाव रोगमुक्त करणे, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे व तो सफल झाला आहे.२००१ च्या मार्च महिन्यात मातृ शिशुकल्याण केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्राचे प्रभारी डॉ. अशोक सारस्वत सांगतात, की, आसपासच्या सुमारे पन्नास गावांतील महिलांना बाळंतपणाच्या आणि तदुत्तर आरोग्यासाठी आवश्यक त्या सोयी हे केंद्र पुरविते. लहान मुलांच्या संगोपनासंबंधीही हे केंद्र मातांना प्रशिक्षित करते. सरकारचेही या प्रकल्पाकडे लक्ष गेले आणि त्याने या केंद्राकडून १८१८ गावांमधील परंपरागत सुईणींचे प्रशिक्षण करून घेतले. अर्थात् सरकारने यासाठी केंद्राला आर्थिक मदतही केली आहे.१९८९ मध्ये येथे वस्तूंच्या उत्पादनाचे केंद्र स्थापन करण्यात आले. या केंद्राची एक भव्य कार्यशाळा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून येथे लोखंड व लाकूड यांच्या अनेक वस्तू तयार केल्या जातात. ट्रॅक्टर ट्रॉली, ग्रिल, शटर, अँगल गेट अशा वस्तूंचे निर्माण होऊ लागले आहे. लाकडापासून, पलंगापासून तो दिवाणापर्यंत अनेक वस्तूंची निर्मिती होत आहे. प्रशिक्षणात वेल्डिंग, टर्निंग, फिटर, डिजेल पम्पाची दुरुस्ती आदींचा समावेश आहे.संस्थेची स्वत:ची १४ एकर जमीन आहे. त्यावर आदर्श शेती केली जाते. दैनंदिन आवश्यकता पूर्ण करणार्‍या सर्व वस्तूंचे येथे उत्पादन होते. येथे आमराई आहे, अनेक फुलांचे ताटवे आहेत. आणि या सर्व भौतिक वस्तूंबरोबरच एक ‘भक्तिधाम’ही आहे. सर्व पंथोपंथांच्या देवतांच्या व थोर संतमहात्म्यांच्या मूर्ती तेथे आहेत. गावात डाकघर, बँक आणि बीएसएनएलचे टॉवरही आहे, हे वेगळे सांगणे नकोच. जयप्रकाश नारायण व प्रभावतीदेवी यांची आठवण करून देणारे एक सुंदर स्मृतिमंदिरही आहे. आपल्या देशातील सर्व गावे, अशी होतील, तर गरिबीचे नाव तरी राहील काय? नानाजी देशमुख संघ स्वयंसेवक असल्यामुळे त्यांनी या गावाला ‘जयप्रभा’ असे नाव दिले. जयप्रकाशजींच्या किती भक्तांना आपल्या एखाद्या प्रकल्पाला, नानाजींनी ज्या डॉ. हेडगेवारांपासून प्रेरणा घेतली त्यांचे, किंवा दीनदयाल उपाध्याय यांचे किंवा प्रत्यक्ष नानाजींचे नाव देऊन एखादा प्रकल्प सुरू करण्याचे सुचेल?• • •
विदेशातील हिंदूपण
* राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून प्रेरणा घेऊन जगातील अनेक देशांमध्ये ‘हिंदू स्वयंसेवक संघ’ कार्यरत आहे. सुमारे ३२ देशांमध्ये हिंदू स्वयंसेवक संघाच्या शाखा आहेत. संघाच्या शाखेसारख्याच. पण सप्ताहातून एकदाच भरणार्‍या. या संघाने ‘हेल्थ फॉर् ह्युमॅनिटी योगासन’ हा कार्यक्रम हाती घेतला. संक्रांतीच्या मुहूर्तावर या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला आणि तो दोन आठवडे चालला. ३१ जानेवारी २०१० ला त्याचे समापन झाले. अमेरिकेत पन्नासाहून अधिक स्थानिक सामाजिक-धार्मिक संस्थांनी यात सहभाग घेतला. कॅलिफोर्निया, इलिनॉईस, न्यूयॉर्क, पेन्सॅलवानिया आणि टेक्सास या राज्यांमध्ये २४ तासांचे योगासन कार्यक्रम झाले. यात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच अन्य तरुणांनीही भाग घेतला. पेन्सॅलवानियाचा विद्यार्थी शशिधर मेसीरेड्डीने १२३ सूर्यनमस्कार घालून उच्चांक गाठला. वॉशिंग्टनच्या रिजवूड एलिमेंटरी स्कूलच्या ५०० विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला. ह्यूस्टन या एका शहरात १६ जानेवारीला अनेक ठिकाणी हा कार्यक्रम झाला. जॉर्ज बुश पार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमात भाग घेणार्‍यांची संख्या शंभर होती. येथे गुजराती समाजाची संख्या चांगली आहे. त्यांनी पतंग उडविण्याचाही आनंद घेतला. या सूर्यनमस्कार यज्ञात, चिनी पर्यटक गुओ वेन जिंग हेही सामील झाले होते.
* अमेरिकेतील इंडियाना राज्याची राजधानी इंडियानापोलिस ही आहे. या शहरी २३ जानेवारी २०१० ला, तेथील महिलांनी चक्क हळदीकुंकवाचा कार्यक्रम संपन्न केला. कार्यक्रमाचे नाव होते ‘हळदीकुंकुम सखीसंमेलन.’ आयोजिका होती शीतल वैद्य. श्रीमला मूर्ती आणि अलका खेरादिया या महिलांनी सूर्यनमस्कार घालून दाखविले. कार्यक्रमाच्या शेवटी तिळगुळाचे वाटप झाले.
* तिकडे वेस्ट इंडीजमधील त्रिनिदाद व टोबॅगो या देशातही मकरसंक्रांतीचा उत्सव साजरा करण्यात आला. मंझानिला समुद्र किनार्‍यावर १० जानेवारी २०१० ला हा कार्यक्रम झाला. अगदी भारतातील संघाच्या पद्धतीने. मुख्य शिक्षकाची शिटी वाजताच सर्व स्वयंसेवक व सेविका, सूर्यनारायणाची पूजा करण्यासाठी सिद्ध झाल्या. पूजा आटोपल्यावर सूर्यनमस्कारांचे प्रात्यक्षिक झाले. कार्यक्रमात ५९ स्वयंसेवक आणि ५४ सेविका सहभागी होत्या.
* ही वॉशिंग्टनची बातमी आहे. २००८ मध्ये ‘पीईडब्ल्यू फोरम’ या संस्थेने एक सर्वेक्षण केले. त्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, ‘‘६५ टक्के अमेरिकन असा विश्‍वास बाळगतात की, अन्य धर्म-उपासना पद्धतीही मोक्ष प्राप्त करून देऊ शकतात.’’ ही खरोखर क्रांती आहे. ख्रिस्ती व इस्लामी धर्म, आपलाच धर्म, आपलाच ईश्‍वर किंवा अल्लाह खरा आणि बाकी सगळे खोटे, असे मानतात. इतरही धर्मपंथ खरे असू शकतात, हे मानणे म्हणजे हिंदू होणे आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी, एक अमेरिकन मिशनरी महिला मला भेटायला आली होती. मी तिला तिचा पंथ (डिनॉमिनेशन) विचारला. ती म्हणाली, ‘‘मी कॅथॉलिक आहे.’’ मी प्रश्‍न केला, ‘‘चर्चमध्ये न जातानाही मोक्ष मिळू शकतो, हे तुम्हाला मान्य आहे काय?’’["Do you accept that there can be salvation outside the Church also"] ती ‘‘होय’’ म्हणाली. मी उत्तरलो, ‘‘मग तुम्ही हिंदू झालात की?’’ तिने आश्‍चर्याने विचारले, ‘‘खरेच!’’ भारतातील ख्रिस्ती व मुसलमान हे मानतील, तर संघर्षाची ९० टक्के कारणे समाप्त होतील.
 * अमेरिकनांचा पुनर्जन्मावरही विश्‍वास वाढत आहे. २४ टक्के अमेरिकनांनी आपला पुनर्जन्मावर विश्‍वास आहे, असे सांगितले आहे. एक तृतीयांश अमेरिकनांची पसंती, मृतांचा दफनविधी करण्याऐवजी दहनविधी करावी, अशी आहे, हे दुसर्‍या एका सर्वेक्षणात आढळले आहे.• • •
आणि आपल्या भारतातही
* आपल्या देशात एक सर्वसाधारण समजूत अशी आहे की, मुसलमानांकरिता गोहत्या ही त्यांची धार्मिक अनिवार्यता आहे. पण ही गोष्ट खरी नाही. नागपूरचेच सुप्रसिद्ध मुस्लिम कार्यकर्ते हाजी अब्दुल पारेखसाहेब यांच्या एका भाषणाची पुस्तिका लखनौच्या झिया पब्लिकेशन्सने प्रसिद्ध केलेली आहे. या पुस्तिकेचे शीर्षक आहे, ‘‘गऊ रक्षा और हिन्दुस्थानी मुसलमान.’’ पारेखसाहेबांचे हे भाषण १९७७ साली, नागपुरात गोरक्षेसंबंधी झालेल्या एका सार्वजनिक सभेत केलेले आहे. ही सभा गीतामंदिरात झाली होती. त्या भाषणाचे सार हे आहे की, ‘‘जेव्हा केव्हा गोहत्येचा प्रश्‍न उपस्थित होतो, तेव्हा तेव्हा सर्व जण मुसलमानांना आपले आघातलक्ष्य बनवितात. परंतु, हा मुसलमानांवर अन्याय आहे.’’ आपल्या भाषणाच्या शेवटी ते म्हणाले, ‘‘गोहत्या आणि गोरक्षा या दोन गोष्टी अलग अलग आहेत; विनाकारण कोणत्याही प्राण्याची हत्या करणे इस्लामला मान्य नाही. गोहत्येशी मुसलमानांचा संबंध जोडणे चूक आहे. गोरक्षेसाठी हिंदूंबरोबर मुसलमानांचेही नाव घेतले गेले पाहिजे. यासाठी मुसलमानांचे सहकार्य नक्की मिळेल. आपल्या हिंदू बांधवांच्या धार्मिक भावनांचा आदर करण्यासाठी मुसलमानांनीही पुढे आले पाहिजे. मुसलमानांच्या वतीने मी आश्‍वासन देतो की, गोरक्षेच्या उद्दिष्टासाठी, आपण जेव्हा केव्हा बोलवाल, तेव्हा आम्ही अवश्य येऊ आणि आपले संपूर्ण सहकार्य देऊ.’’पारेखसाहेबांच्या बोलण्यात बरेच तथ्य असावे, असे मला वाटते. दिल्लीहून प्रकाशित होणार्‍या ‘पाञ्चजन्य’ साप्ताहिकाच्या दिनांक १४ जानेवारी २०१० च्या अंकात, मुजफ्फर हुसैन यांचा एक लेख आहे. ‘जौधपूर-बाडमेर मार्गपर मुस्लिम गोशाला’ हे त्या लेखाचे शीर्षक आहे. राजस्थानात ‘मारवाड मुस्लिम एज्युकेशनल वेलफेअर’ या नावाची एक संस्था आहे. या संस्थेचे एक ‘सीनियर सेकंडरी स्कूल’ आहे. त्यात ३२०० विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. या संस्थेद्वाराच एक गोशाळाही चालविली जाते. या गोशाळेचे नाव ‘मुस्लिम गोशाला’ असेच आहे. या गोशाळेत सध्या १२० गाई आहेत. या गोशाळेतचे सर्व काम महम्मद आतिक नावाचे गृहस्थ पाहतात. मुजफ्फर हुसैन लिहितात, ‘‘आम्ही त्यांच्याबरोबर गोशाळेत जेव्हा प्रवेश केला, तेव्हा गाई हंबरायला लागल्या.’’ एका प्रश्‍नाच्या उत्तरात आतिक म्हणाले, ‘‘या भागात मोकाट गाई शेतीचे फार नुकसान करायच्या. तेव्हा आमच्या संस्थेने ठरविले की, गाईंचे पालन करायचे. गाईच्या मालकाने, आपली गाय नेतो म्हटले, तर ती आम्ही त्याला नेऊ देतो. त्यासाठी आम्ही कसलाही मोबदला घेत नाही. अनेक लोक, आपली गाय, आम्हाला पाळण्यासाठी देतात. ती दूध द्यायला लागली की ते घेऊन जातात. आटल्यानंतर पुन: आणून देतात. या गोशाळेवर आम्हाला दरमहा ६० हजार रुपये खर्च येतो. काही उदार लोक चारा आणि ढेप आणूनही देतात, ती आम्ही स्वीकारतो. या गाईंच्या आरोग्यासाठी आफताब नावाच्या डॉक्टरचीही आम्ही नियुक्ती केली आहे. आमच्या या गोशाळेमागची प्रेरणा जोधपूर संस्थानचे माजी महाराज उमेदसिंह हे आहेत. हकीमखान आणि अब्दुस्सत्तार आणि हकीमखानची पत्नी आलाक्खी या गाईंच्या चार्‍यापाण्याची व्यवस्था बघतात. या गाईंशी त्यांचे संपूर्णच वागणे, असे काही आत्मीयतेने भरलेले असते की, ही जनावरे जणू काही त्यांच्या कुटुंबाचेच घटक आहेत, असे वाटावे.’’मुजफ्फर हुसैन यांनी काही जुन्या मुस्लिमांची उदाहरणे दिली आहेत. कृष्णभक्त रसखान हे नाव सर्वांच्या परिचयाचे आहे. त्याने म्हटले आहे, ‘‘परमेश्‍वर मला पशुयोनीत पुनर्जन्म देईल तर त्याने मला गाय करावे, ज्या गाईला कृष्ण भगवान चरायला नेत असत.’’ स्वातंत्र्यापूर्वी मीरतचे प्रसिद्ध कवी मौलाना मोहम्मद इस्माईल, आपल्या मदरशात, स्वत:ची ‘हमारी गाय’ ही कविता रोज मुलांकडून म्हणवून घेत असत. त्या कवितेची पहिली ओळ आहे, ‘‘रब का शुक्र अदा कर भाई| जिसने हमारी गाय बनाई|’’ (अर्थ - ज्या ईश्‍वराने गाईला निर्माण केले, त्या ईश्‍वराचे आभार माना.)खरेच, भारतातील अधिकांश मुसलमानांचा असा भाव आणि स्वभाव बनला, तर किती तरी प्रश्‍न कसे चुटकीसरशी सुटतील!
* या वर्षी हरिद्वारला महाकुंभ आहे. या महाकुंभात शिया पंथाचे धर्मगुरू आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे उपाध्यक्ष कल्बे सादिक गंगास्थान करणार आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, ‘‘कुंभ भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. आणि येथील मुसलमान या संस्कृतीचा सन्मान करतात.’’
* हिमाचल प्रदेशातील कांग्रा शहरात माता ब्रजेश्‍वरी हे एक शक्तिपीठ आहे. या शक्तिपीठाचे वैशिष्ट्य हे की, या भगवतीचे उपासक अनेक मुसलमानही आहेत. पाकिस्तानात असणार्‍या ‘बाजीगर’ जनजातीचे लोक, या देवीला आपली कुलदेवता मानतात. दरवर्षी देवीच्या यात्रेकरिता ते येथे येत असतात. फाळणीपूर्वी, ते येथेच राहत होते. फाळणीच्या गदारोळात ते पाकिस्तानात गेले. इतिहासकाळात, कोणत्या तरी निमित्ताने त्यांनी इस्लाम कबूल केला असावा. आता भारतातील देवीभक्तांचे हे दायित्व आहे की, त्यांनी त्यांना त्यांच्या मूळ धर्मात आणि मूळ देशात आणावे. झोपलेल्या हिंदू समाजाला हे कधी तरी उमजेल काय?
* इ. स. २००२ मध्ये दिल्लीच्या तिहार तुरुंगात, कैद्यांच्या विशाल समुदायासमोर गीताजयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला. माझे दिल्लीतील मित्र श्री. रामकृष्ण गोस्वामी हे तुरुंगातील कैद्यांना गीता शिकवीत असतात. अगदी सरकारच्या अनुमतीने! कैद्यांना अपराधप्रवृत्तीपासून दूर करण्यासाठी गोस्वामींचे हे कार्यक्रम अनेक तुरुंगात होत असतात. अशाच एका कार्यक्रमात, गीतजयंतीच्या शुभमुहूर्तावर डॉ. मुहम्मद हनीफ शास्त्री यांच्याशी माझी ओळख झाली. ते वेद आणि प्राचीन संस्कृत साहित्याचे अभ्यासक आहेत. २००२ नंतर या वर्षी म्हणजे २०१० च्या २१ मार्चला दिल्ली येथे, श्री. गोस्वामी द्वारा आयोजित एका कार्यक्रमात पुन: त्यांची भेट झाली. ‘गीता आणि राष्ट्रीय सुरक्षा’ हा या परिसंवादाचा विषय होता. डॉ. शास्त्रींचे सुरेख भाषण झाले. ‘‘वैदिक साहित्य में मानव कर्तव्य’’ हा त्यांचा एक उत्तम ग्रंथ आहे. असे समजते की, दिल्लीच्या संस्कृत प्रतिष्ठानात ते प्राध्यापक आहेत व यावर्षी त्यांना ‘राष्ट्रीय सद्भावना’ पुरस्काराने सरकारतर्फे अलंकृतही करण्यात आले आहे.• • •
जी. पुल्ला रेड्डी
आज आमच्या समर्थ प्रभात शाखेत, मूळचे आंध्रचे श्री. राघवलू या संघप्रचारकाने बोलण्याच्या ओघात पुल्ला रेड्डी यांच्याविषयी माहिती दिली. राघवलू, गेल्या ४४ वर्षांपासून संघाचे प्रचारक आहेत. ‘संघप्रचारक’ म्हणजे पूर्णकालिक, अविवाहित, मानधन न स्वीकारता, संघ सांगेल ते व जेथे सांगेल तेथे कार्य करणारा कार्यकर्ता, हे आता संघाबाहेरील बर्‍याच जणांनाही माहीत झाले आहे. राघवलू प्रथम १६ वर्षे, आंध्र प्रांतातच प्रचारक होते. नंतर वि. हिं. प.मध्ये त्यांना पाठविण्यात आले. ते सध्या अ. भा. वि. हिं. प.चे संयुक्त महासचिव आहेत. त्यांनी पुल्ला रेड्डींसंबंधी जी माहिती आज दिली, ती चकित करणारी आहे.पुल्ला रेड्डी हे मिठाई बनविणारे मोठे हलवाई आहेत, एवढेच मला ज्ञात होते. पण त्यांच्या कारखान्यात एक हजार कामगार मिठाई बनविण्याचे कार्य करतात, हे आजच प्रथम कळले. ‘जी. पुल्ला रेड्डी स्वीट्‌स’ या नावाने त्यांची मिठाई प्रसिद्ध आहे. हैद्राबादेत सात, तर कर्नूलमध्ये तीन त्याची केंद्रे आहेत. त्यांचा मुलगा व जावईही याच व्यवसायात आहेत. पण ते वेतनभोगी आहेत. त्यांना पाच हजार रुपये मासिक वेतन मिळते. मुलाने एकदा तक्रार केली की, आम्हाला एवढे अल्प वेतन का? पुल्ला रेड्डींचे उत्तर होते, ‘‘कोणत्या कामगाराला पाच हजार रुपये महिन्यापेक्षा अधिक वेतन मिळते?’’पुल्ला रेड्डी प्रथम स्थानिक स्तरावर विहिंपचे कार्यकर्ते होते. पुढे ते अ. भा. वि. हिं. प.चे कोषाध्यक्ष झाले. गेल्या वर्षी मृत्यू होईपर्यंत ते त्याच पदावर होते. किती पैसे द्यावे त्यांनी वि. हिं. प.ला? तर दरमहा दोन लाख रुपये! सर्व संघपुरस्कृत सेवाकार्यांना मदतीचे त्यांचे बजेट असे वार्षिक दोन कोटी रुपयांचे!ते फारसे शिकलेले नव्हते. फक्त ५ व्या वर्गापर्यंत. अत्यंत गरीब परिस्थितीत वाढले. पण श्रीमंत झाल्यावरही त्यांना त्या श्रीमंतीचा गर्व झाला नाही. आपली श्रीमंती समाजासाठीच आहे, या ध्येयाने झपाटल्यासारखे ते वागले. त्यांचे घर अगदी साधे होते. कोट्यधीशाला साजेसे तर अजीबात नव्हते. मी त्यांना अनेकदा पाहिले आहे. त्यांच्या पोषाखावरून त्यांच्या श्रीमंतीची कल्पना यायचीच नाही. ती यायची त्यांच्या औदार्यातून. संघाचे सर्व प्रकाशित साहित्य ते खरेदी करायचे आणि मिठाई घ्यायला आलेल्या प्रत्येक ग्राहकाला ते नि:शुल्क द्यायचे. १९९१ साली, रामजन्मभूमीचे आंदोलन तीव्र असताना, ते विमानातून प्रवासाला निघाले होते. रामजन्मभूमीचे सत्य निवेदन करणारी दोन-अडीचशे पुस्तके त्यांनी बरोबर घेतली. विमानात बसणार्‍या प्रत्येक प्रवाशाला एकेक पुस्तक दिले. त्या सर्वांचे पत्ते त्यांनी प्राप्त केले; आणि पुन: पत्रव्यवहार करून पुस्तक कसे वाटले याची विचारणा केली! समाजासाठी अशा आत्मीयतेने, परिश्रमाने आणि त्यागाने कार्य करणारे कार्यकर्ते ज्या संघटनेजवळ आहेत, ती संघटना जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना ठरली तर नवल कोणते?
रविवार, दि. ११ एप्रिल २०१०, दै. तरुण भारत, सोलापूर.
Tags:

About author

AMAR PURANIK - I am a Journalist. Working with Maharashtra's well known Marathi Daily newspaper "TARUN BHARAT" Solapur as a Sub-Editor. As well as*"HINDUSTHAN SAMACHAR" Nationwide Multilingual News Services as a Solapur district corrospondent. Marathi Articles written on : Current topics, National Issues, Maharashtra Issues, Solapur Issues, Solapur Industries Development, Hindustani Classical Music, Indian Astrology, Science And Technology, Hinduism, Corruption, Social issues.