News Update :

आतंकवाद आणि त्याचा सामना

आतंकवाद आणि त्याचा सामना
आतंकवादाच्या समस्येने संपूर्ण जगच त्रस्त आहे, भयभीत आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रालाही, ज्याच्याजवळ सर्वाधिक अण्वस्त्रांचा साठा आहे, आतंकवादाने भयभीत केले आहे. रशिया त्यापासून काहीसा अस्पृश्य होता. पण गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये, त्यानेही आतंकवादाचा भोग भोगला आहे. प्रत्यक्ष राजधानी मॉस्कोत हल्ला करून, आत्मघाती जिहादी आतंकवाद्यांनी रशियन सरकारची झोप उडविली आहे. परंतु, मी, येथे जागतिक आतंकवादाची फारशी चर्चा करणार नाही. भारताच्या संदर्भातच काहीशा विस्ताराने लिहिणार आहे. अमरावती जिल्ह्यातील वरूड या तालुकास्थानी असलेल्या देशबंधू दास वाचनालयात, दिनांक २७ मार्चला, मी या विषयावर जे भाषण केले, त्याची पृष्ठभूमी या लेखाला आहे.
तिसरा आतंकवाद
आपल्या देशात प्रामुख्याने दोन प्रकारच्या आतंकवादाची चर्चा चालू असते. ते दोन आतंकवाद म्हणजे (१) नक्षली आतंकवाद आणि (२) जिहादी आतंकवाद. पण, आपल्या देशात तिसराही एक आतंकवाद सक्रिय आहे. तो ख्रिस्ती चर्चद्वारा प्रेरित आणि पोषित आहे. सध्या त्याचे क्षेत्र परिमित आहे. म्हणजे भारताच्या ईशान्य भागात विशेषत: आसाम, मणिपूर व त्रिपुरा या राज्यांमध्ये तो अनुभवास येत आहे. उल्फा, बोडो, मणिपूरमधील जनजाती विरुद्ध मैदानातील लोक यांच्या रक्तरंजित कारवायांच्या मागे चर्च आहे. सर्वच ख्रिस्ती पंथोपंथांचे चर्च या कारवायांमध्ये गुंतले आहे, असे मात्र नाही. पण बॅप्टिस्ट चर्च यात गुंतले आहे, याविषयी शंका घेण्याचे कारण नाही. बॅप्टिस्ट चर्चच्या उग्रवादाचा तडाखा ख्रिस्तीतरांनाच बसतो, असे नाही. अन्य पंथीय चर्चेसनाही त्यांनी आपले आघातलक्ष्य बनविले आहे. रोमन कॅथॉलिक चर्चने तर त्यांच्यावर जाहीर आरोपच केला आहे. सुमारे एक-दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अनेक चर्चेसच्या एकत्रीकरणात, कॅथॉलिक चर्चच्या पुढार्‍यांनी नाव न घेता, असा प्रस्ताव मांडला की, चर्चेसनी आपापसात भांडू नये, एकमेकांचे कळप पळवू नयेत. त्यांचा रोख बॅप्टिस्ट चर्चवर होता. हिंसेचा वापर करून आपल्या विरोधकांचा काटा काढण्याचा संकोच चर्चला नाही हे आता सर्वज्ञात आहे. ओरिसाच्या कंधमालमधील स्वामी लक्ष्मणानंदांची हत्या त्याचे ताजे उदाहरण आहे.
शांतिदूत आणि हिंसा
तथापि, हे मान्य केले पाहिजे की, येशूची शिकवण सामान्यत: शांतीची आहे. ‘सर्मन ऑन द माऊंट’(पहाडावरील उपदेश) त्याचे उदात्त उदाहरण आहे. ‘एका गालावर थापड मारली, तर दुसरा गाल पुढे कर, पण दुष्टपणाचा प्रतिकार करू नको,’ एवढी आत्यंतिक अहिंसा येशूने येथे प्रतिपादली आहे. याच उपदेशात त्याने म्हटले आहे की, ‘‘मी विनाशासाठी येथे आलो नाही, अपूर्णत्व पूर्ण करण्यासाठी आलो आहे.’’ (I am not come to destroy but fulfil) हा उपदेश, बायबलच्या ‘मॅथ्यू’ नावाच्या प्रकरणात अंतर्भूत आहे. परंतु, बायबल सर्वत्र अहिंसेचा पुरस्कार करते, असे मानण्याचे कारण नाही. याच ‘मॅथ्यू’ प्रकरणात १० व्या उपप्रकरणात येशू सांगतो, ‘‘मी पृथ्वीवर शांती स्थापण्यासाठी आलो आहे, असे समजू नका. मी शांती घेऊन नव्हे, तलवार घेऊन आलो आहे.’’ ‘ल्यूक’ नावाच्या प्रकरणात तर सरळ सरळ हिंसेला चिथावणी आहे. ‘‘ज्यांना माझे प्रभुत्व मान्य नाही, अशा माझ्या शत्रूंना माझ्यासमोर आणा आणि त्यांना माझ्यासमोर ठार करा.’’ (ल्यूक १९-२७)‘ल्यूक’मधील अशी चिथावणीखोर वक्तव्ये आणखीही उद्धृत करता येतील. पोर्तुगीज आणि स्पेनमधील ख्रिस्ती मिशनर्‍यांनी, कदाचित, याच वचनांचा आधार घेऊन व ‘इन्क्विझिशन’ न्यायालये स्थापन करून लोकांना जिवंत जाळण्यास कमी केले नाही. ख्रिस्तीतरांवर तर त्यांनी असे क्रूर अत्याचार केलेच; गोव्याच्या इतिहासात त्याची असंख्य उदाहरणे नमूद आहेत; पण ख्रिस्ती धर्माच्या अन्य पंथीयांनाही या क्रौर्यातून सोडण्यात आले नव्हते. अर्थात, हा सारा काळा इतिहास आता मागे पडलेला आहे. तथापि, हेही विसरता कामा नये की, स्वत:ला ख्रिस्तांचे अनुयायी म्हणविणार्‍या राष्ट्रांनी विसाव्या शतकात केवळ पाव शतकाच्या अंतराळात दोन मानवसंहारक महायुद्धे जगावर लादली होती. इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका एका बाजूला, तर जर्मनी, इटली दुसर्‍या बाजूला, अशी युद्धे झालीत; आणि दोन्ही बाजू शांतिप्रिय येशूला मानणार्‍या होत्या! आजही महाभयंकर अण्वस्त्रांचा साठा याच राष्ट्रांकडे आहे. तथापि, सामान्यत: ख्रिस्ती संप्रदायांचा कल शांतीने कार्य साधण्याचा आहे. हिंसा वर्ज्य नसली तरी हिंसेचा गौरव त्यांना अभिप्रेत नाही. जाणकार मात्र सांगतात की, अलीकडे, या चर्चप्रेरित हिंसक आतंकवादाने, ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये धुमाकूळ घातला आहे. अद्यापि दिल्लीला त्याची आच लागली नाही, असे दिसते.
नक्षली आतंकवाद
ज्याची झळ दिल्लीला लागली आहे व ज्याचा बंदोबस्त करण्यासाठी केंद्र सरकारने काही निश्‍चित पावले उचललेली आहेत, तो आतंकवाद, नक्षली आतंकवाद म्हणून ओळखला जातो. ‘नक्षलबाडी’ या नावाचे एक गाव पश्‍चिम बंगालमध्ये आहे. या आतंकवादाची म्हणा, दहशतवादाची म्हणा, सुरवात, नक्षलबाडीपासून झाली असल्यामुळे, या आतंकवादाला नक्षलवादी आतंकवाद असे म्हटले जाते. चर्चपोषित आतंकवाद आणि जिहादी आतंकवाद यांना त्यांच्या त्यांच्या धर्मसंप्रदायांपासून म्हणजे त्या संप्रदायाच्या शिकवणुकीतून प्रेरणा मिळाली आहे, तर नक्षली आतंकवाद्यांची प्रेरणा माओ त्से तुंग आहे. म्हणजे त्यांचे प्रेरणास्थान धार्मिक नाही. हे सर्व जण जाणतातच की, माओनेच चीनमध्ये यशस्वी क्रांती घडवून आणली, तेथील सरकार उलथवून टाकले आणि तेथे साम्यवादी राजवट स्थापन केली. आजच्या चिनी शासकांनी माओ या व्यक्तीला झिडकारले असले, तरी त्याच्या विचारांचा आणि रणनीतीचा प्रभाव अजूनही कायम आहे. या रणनीतीच्या बळावरच चीन आक्रमक बनला आहे. तिबेट त्याने केव्हाच गिळंकृत केला. नेपाळातही चीनचे बंदे आपला प्रभाव राखून आहेत. हिंसेच्या मार्गानेच त्यांनी तेथे सत्ता प्रस्थापित केली होती. ती अल्पकाळच टिकली हा भाग वेगळा. पण, अजून, त्यांचे सामर्थ्य घटलेले नाही आणि पुन:, जुन्या मार्गानेच सत्ता मिळविण्याचा ते प्रयत्न करणार नाहीत, असेही नाही.
समाजवादाचे आकर्षण
हे नक्षली आतंकवादी स्वत:ला तसे मार्क्सवादीच समजतात. परंतु, आपल्या हिंसाचाराच्या समर्थनार्थ, ते कार्ल मार्क्सला उलटे उभे करतात. हे खरेच आहे की, मार्क्सने क्रांतीचा मार्ग सांगितला. त्याच्या चिंतनाप्रमाणे, भांडवलवादी रचना, कामगारांना आणि कष्टकर्‍यांना कधीच न्याय देणार नाही. क्रांतीच्या मार्गानेच त्यांची उचलबांगडी करावी लागेल. मार्क्सवादाला म्हणा की, साम्यवादाला म्हणा, हिंसा वर्ज्य नाही. पण त्याला पहिली पसंतीही नाही. मार्क्सची भाकिते खोटी ठरली, हेही खरेच आहे. औद्योगिक क्रांती ज्या देशांमध्ये प्रथम झाली, आणि जेथे नवा भांडवलदार वर्ग निर्माण झाला, तेथे कामगारांची स्थिती इतकी दयनीय आणि शोचनीय होईल की, ते संघटित होऊन, भांडवलशाही सत्तेचा विनाश घडवून आणतील, असे मार्क्सचे भाकित होते. त्यानुसार, इंग्लंडमध्ये क्रांती व्हावयाला हवी होती. पण तेथे ती झाली नाही. ती झाली मागासलेल्या रशियात. रशियात सत्तेवर आलेल्या कम्युनिस्ट पार्टीने, अत्यंत कठोरपणे संपत्तीची खाजगी मालकी समाप्त केली. आपल्याच हजारो देशबांधवांची कत्तल केली. असंख्यांना सैबेरियाच्या नरकात पाठविले. उत्पादनाची व वितरणाची सर्व साधने सरकारच्या मालकीची झाली. शास्त्रीय समाजवादाच्या (सायंटिफिक सोशॅलिझम्) स्थापनेसाठी आपण हे केले, असे कम्युनिस्ट पार्टीचे कथन असे. अन्य प्रकारच्या समाजवाद्यांची जसे डेमोक्रॅटिक सोशॅलिझम्, फेबियन सोशॅलिझम्‌ची, या मंडळींनी टिंगलही केली. स्टॅलिनच्या काळात रशिया बघून आलेल्यांना ‘समाजवादाने’ असे काही झपाटले होते की, तेही आपापल्या देशात ‘समाजवादी’ रचना आणण्याच्या उद्योगाला लागले. ‘समाजवाद’ फॅशनेबल शब्द बनला. इतका फशनेबल की, आपल्या घटनेत, दुरुस्ती करून, घटनेच्या आस्थापनेत तो २६ वर्षांनंतर घुसविण्यात आला! राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून प्रेरणा घेऊन राजकारणात शिरलेल्यांनाही, या शब्दाची अशी भुरळ पडली की, १९८० साली, नव्याने स्थापन केलेल्या आपल्या पक्षाचे ध्येय ‘गांधीवादी समाजवाद’ राहील, हे त्यांनी घोषित केले. द्वितीय सरसंघचालक कै. श्रीगुरुजी यांच्या ‘नॉट सोशॅलिझम् बट हिंदूराष्ट्र’ या गाजलेल्या भाषणाचाही त्यांना विसर पडला. पण आता समाजवादाचे आकर्षण संपले आहे. केवळ भारतातच नाही, तर जगातही समाजवाद निष्प्रभ झाला आहे. आपल्या संविधानाच्या आस्थापनेतील ‘सोशॅलिस्ट’ शब्द, अपमानित, तुच्छ आणि तिरस्कृत जिणे जगत आहे. कोणीतरी साहस करून, त्या शब्दाची थट्टा थांबविण्यासाठी, आस्थापनेतून त्याला मुक्त करण्याची गरज आहे.अरेच्चा, हे जरा विषयांतरच झाले. तर काय, मार्क्सला हिंसाचार मान्य असला, तरी हिंसेचा गौरव त्याने केला नाही. ती एक अपरिहार्य परिस्थिती आहे, असेच तो समजत असे. पण आता एक ‘नवे डावेपण’ घेतलेली चळवळ सुरू झाली आहे. या चळवळीचा आदर्श माओ आहे. ‘द न्यू लेफ्ट’ या नावाने ही चळवळ ओळखली जाते. भारतातील नक्षलवाद हा ‘न्यू लेफ्ट’चाच एक आविष्कार आहे. क्युबातील चे गुवेरा, फान्समधील जीन पॉल सार्त्र, निग्रो मनोरोगतज्ज्ञ फान्झ फॅनॉं हे या ‘नव्या डावेपणाचे’ आधुनिक गुरू आहेत. मी येेथे फॅनॉंची दोन वचने तेवढी उद्धृत करतो. ‘‘केवळ हिंसाच, जनतेने केलेली हिंसाच, जननेत्यांनी प्रशिक्षित आणि संघटित केलेली हिंसाच, लोकांना सामाजिक सत्यांचे ज्ञान करून देते आणि त्याची किल्लीही त्यांना देते.’’ (Violence alone, violence committed by the people, violence educated and organized by its leaders makes it possible for the masses to understand social truths and gives the key to them.)  तो म्हणतो, ‘‘ हिंसा लोकांना न्यूनगंडातून, निराशेतून आणि निष्क्रियतेतून मुक्त करते. ती त्याला निर्भय बनविते आणि त्याचा आत्मसन्मान त्याला प्राप्त करून देते.’’ मूळ शब्द आहेत,"Violence frees the native from his inferiority complex, and from his dispair and inaction, it makes him fearless and restores his self -respect" (The New Left : Foreword by Maurice  Cranston - Page 9)
दहशतीच्या शस्त्राला क्रौर्याची धार
भारतात सक्रिय असलेल्या नक्षलवादी आतंकवादाचे स्फूर्तिस्थान हे नवे डावेपण आहे. विस्तारवादी चीन, आपल्या राजकीय स्वार्थासाठी हे आतंकवादी डावेपण पुष्ट करीत आहे. तो या नक्षल्यांना सर्व प्रकारचे साह्य करीत आहे. नेपाळमधील माओवाद्यांना चीनकडूनच सर्व प्रकारची मदत मिळाली आहे. नेपाळातील माओवादी आणि भारतातील नक्षलवादी यांच्या गुप्त बैठकी, बिहारात झाल्या आहेत. नक्षलवाद्यांची नावे मात्र अनेक आहेत. कुठे ‘माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर,’ कुठे ‘पीपल्स वॉर ग्रूप’ तर अन्यत्र अन्य काही नामे स्वीकारून ते कार्यरत आहेत. नेपाळपासून खाली कर्नाटकपर्यंत एक सलग भूखंड (कॉरिडॉर) त्यांना आपल्या ताब्यात आणावयाचा आहे. सर्व नक्षलवादी हिंसाचार, नेपाळच्या सीमेपासून, बिहार, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्राचा गडचिरोली जिल्हा, आंध्रचा तेलंगणा विभाग, यात सक्रिय आहे. आतापर्यंत त्यांनी बंगालमधील कम्युनिस्ट राजवटीला आपले आघातलक्ष्य बनविले नव्हते. तेथील सरकारने, त्यांच्या विरोधात काही केले नाही, काही केले असेल, तर ते या नक्षल्यांच्या सोयीचेच होते, पण आता, हा भस्मासूर त्यांच्यावरच उलटला आहे. पहाडी व जंगलाचा भाग, यांना आपल्या गुप्त कारवायांसाठी, शस्त्रांचा साठा करण्यासाठी आणि तेथील अज्ञानी व गरीब जनतेचे सहकार्य मिळविण्यासाठी उपयुक्त असल्यामुळे, त्या भागात एक प्रकारे त्यांचे स्वतंत्र राज्यच निर्माण झाले आहे. ट्रकच्या वाहतूकदारांकडून ते नियमाने पैसे उकळतात. सरकारला आपल्या भागात सडका बांधू देत नाहीत. सडक बांधली तर पोलिसांची रहदारी होईल, याची त्यांना भीती वाटते. ते जनतेच्या विकासाच्या गोष्टी करतात, पण सरकारला विकास करू देत नाहीत. काही ठिकाणी त्यांची स्वतंत्र न्यायालये आहेत, असे म्हणतात. सुमारे १२ वर्षांपूर्वी सध्याच्या झारखंड प्रदेशात, जो त्यावेळी बिहारचाच भाग होता, प्रवास करीत असताना, एका गावी, आदल्या दिवशी एका शिक्षकाची हत्या माओवाद्यांनी केल्याची बातमी कळली. त्याच्या कुटुंबाच्या सांत्वनासाठी, आम्ही त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या पत्नीने सांगितले की, दोनदा या शिक्षकाला माओवाद्यांनी बैठकीसाठी बोलाविले होते. पण तो गेला नाही, त्याची शिक्षा म्हणून त्याला घरातून ओढून नेण्यात आले आणि त्याच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आली. सर्वच आतंकवाद्यांची एकच कार्यपद्धती आहे. क्रौर्याचा अवलंब करून, दहशत पसरविणे. कुणी पोलिसांना मदत करीत आहे, असा संशय आला की, गळा चिरून त्याला ठार मारणे. समजावणे हा प्रकारच नाही. दहशत हे त्यांचे शस्त्र आहे. क्रौर्य त्याची धार आहे. फान्झ फॅनॉंने तेच सांगितले आहे.
चांगली रणनीती
सुदैवाची गोष्ट ही की, हा नक्षली आतंकवाद संपविण्याचे केंद्र सरकारने मनावर घेतले, असे दिसते. कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम राज्य सरकारांचे आहे, असे म्हणून आपले हात झटकून मोकळे होण्याची रीत आता संपलेली दिसते. नक्षलग्रस्त भागातील सुरक्षाव्यवस्थेचे केंद्रीकृत प्रबंधन तयार झाले आहे. त्यामुळे, सिरोंचात गडबड करून, आंध्रात पळून जाणे आता सोपे नाही. या केंद्रीकृत प्रबंधनात राज्यसरकारांनी मनापासून साथ द्यावयाला हवी. बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र व आंध्र यातील सरकारांप्रमाणे झारखंडच्या सरकारलाही या मोहिमेत सहभागी होण्यासाठी बाध्य केले पाहिजे. राज्यपाल जगमोहन यांनी काश्मिरातील हिंसाचारी फुटीरवाद्यांना आटोक्यात आणण्यासाठी छोट्या छोट्या भागात, क्रमाक्रमाने कर्फ्यू लावून आणि घराघराची झडती घेऊन, ज्याप्रमाणे शस्त्रास्त्रे गोळा केली आणि अपरिचितांना तुरुंगाची वाट दाखविली, त्याप्रमाणे या नक्षलग्रस्त भागाचीही क्रमाक्रमाने झडती घेतली पाहिजे. या मोहिमेत अपरिचित परके आढळणार नाहीत, पण शस्त्रे नक्की हाती लागतील. केंद्रीकृत प्रबंधन असल्यामुळे, आतंकवाद्यांना या राज्यातून त्या राज्यात पळून जाताही यावयाचे नाही. आपण आशा करू या की, केंद्राच्या या अभियानाला लवकरात लवकर यश येईल, या भागातील दहशतवाद व त्यातील क्रौर्य संपेल आणि शांततापूर्ण विकासाच्या वाटा मोकळ्या होतील. या नक्षलग्रस्त भागातील जनतेच्या काही समस्या नक्कीच आहेत. त्यांचेही समाधान होण्याचा मार्ग सुकर होईल.
इस्लामप्रेरित आतंकवाद
तिसरा आतंकवाद इस्लामप्रेरित आहे. पवित्र कुराणातील आयतांचे या अधम कृत्यांना समर्थन आहे, अशी जिहादी आतंकवाद्यांची मनोधारणा आहे. दोन आठवड्यापूर्वी ‘खरा इस्लाम कोणता’ या शीर्षकाच्या माझ्या लेखात मी इस्लामी दहशतवादाची पुरेशी विस्तारित चर्चा केली आहे. तिची इथे पुनरावृत्ती करीत नाही. नक्षली आतंकवादाची समस्या भारतापुरती, त्यातही, भारताच्या विशिष्ट क्षेत्रापुरती, तूर्तास तरी, मर्यादित आहे. जिहादी आतंकवाद ही जागतिक समस्या आहे. संपूर्ण सभ्य, सुसंस्कृत जगत त्याच्या भीषण छायेखाली आहे. २००१ मध्ये अमेरिकेच्या प्रतिष्ठेच्या स्थानांवर हल्ला करून त्यांनी आपली शक्ती व क्षमता जगाला दाखवून दिली आहे. त्याचा वचपा काढण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्थान भाजून काढला. तालिबानची राजवट उलथवून टाकली. पण तालिबान शरण आलेले नाहीत. ओसामा बिन लादेन अजून हाती लागला नाही किंवा मारण्यातही आलेला नाही. आता अमेरिकेनेही हात टेकलेले दिसतात. दीड वर्षामध्ये आपली व मित्र राष्ट्रांची सेना अफगाणिस्थानातून काढून घेण्याचे शब्द उमटलेले आहेत. ‘सौम्य’ तालिबान्यांशी वाटाघाटी करण्याचा विचार असल्याच्याही बातम्या प्रकट झाल्या आहेत. आणि अमेरिकेकडून त्यांचा इन्कार झालेला नाही, हे ध्यानात घेतले पाहिजे. या जिहादी आतंकवादाच्या नायनाटासाठी पाकिस्तान अमेरिकेला आपला सहाय्यक वाटतो, ही आणखी एक विचित्र गोष्ट आहे. नाटो सेना अफगाणिस्थानातून हटल्या की, अफगाणिस्थानातील करझाईचे आणि पाकिस्तानातील जरदारींचे सरकार गडगडणार, हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज नाही, इतकी परिस्थिती स्पष्ट आहे. आता रशियाही, या जिहादी आतंकवादाचे आघातलक्ष्य बनला आहे. अफगाणिस्थान अमेरिकेपासून खूप लांब आहे. त्यामुळे, जिहादी आतंकवादाचे समूळ उच्चाटन करणे, अमेरिकेसाठी अडचणीचे आहे. रशियाचे तसे नाही. जिहादी आतंकवादाचे सध्याचे मूळ असलेला चेचन्या प्रांत रशियाचा भाग आहे. नुकताच आतंकवादी आत्मघाती हल्ला झालेला दागेस्तान प्रांत रशियात आहे. रशियाचे अध्यक्ष तेथे जाऊन आले आहेत. त्यांनी ‘जशास तसे’ या न्यायाने आपल्या सेनेला क्रूरतेचा अवलंब करून का होईना हा जिहादी आतंकवाद समाप्त करण्याचा आदेश दिला आहे. भारतात मात्र स्थिती विचित्र आहे. नक्षली आतंकवादाच्या विरोधात जशी सरकारची स्पष्ट व नि:संदिग्ध भूमिका आहे, तशी जिहादी आतंकवादाच्या संबंधात नाही. मतपेटीचे राजकारण, या परिणामशून्य नीतीला कारणीभूत आहे. स्वातंत्र्यापूर्वी, खिलाफतीच्या आंदोलनापासून, फुटीरतावाद्यांची खुशामत करण्याचे जे धोरण कॉंग्रेसने अवलंबिले होते, आणि ज्या धोरणाची निष्पत्ती म्हणून देशाचे तुकडे झाले, तेच धोरण, संकुचित राजकीय स्वार्थापायी, आजचे कॉंग्रेसी सरकारही अवलंबीत आहे. सारेच मुसलमान आतंकवादी नाहीत. त्यांची फार मोठी संख्या शांतता व सुव्यवस्था चाहते आहे, ते राष्ट्रीय प्रवाहात सामीलही होत आहेत. पण, सरकारचे धोरण फुटीरवाद्यांना कुरवाळण्याचे आहे. सारेच ढोंगी सेक्युलरवादी फुटीरतावाद्यांच्या खुशामतीच्या स्पर्धेत उतरले आहे. नुकतीच उ. प्र.त बरेली येथे मुसलमानांनी दंगल घडवून आणली. या दंगलीचा म्होरक्या असलेल्या इत्तेहाद मिल्लत कौन्सिलचा अध्यक्ष मौलाना तौकिर यांना अटक केल्यानंतर, मायावतींच्या सरकारने, ही कडक कारवाई करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांची बदली केली आणि तौकिर साहेबांना मुक्त केले! यातून कोणता संकेत मिळाला दंगेखोरांना? त्यांच्या भडकाऊ भाषणाचे वृत्त काही वृत्तपत्रांनी प्रकाशित केले, त्यातले एक वाक्य आहे, ‘‘बरेली तो बहाना है, पूरे हिंदुस्थान को जलाना है|’’ असे हे मौलाना राजरोसपणे हिंडत आहेत. जिहादी आतंकवाद्यांची हिंमत वाढली, तर त्यातआश्‍चर्य कोणते? सभ्यता व सुसंस्कृतपणा यांची जाण असणार्‍या मुसलमान बंधूंची शक्ती त्यांच्या विरोधात एकजूटपणे उभी करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला आपल्या समाजाचे समर्थन नाही, हे जाणवल्यानंतरच हा आतंकवाद संपेल. शिखांचा आतंकवाद शीख समाजाचा पाठिंबा नाहीसा होताच समाप्त झाला. पंजाबचे कॉंग्रेसचे मुख्यमंत्री सरदार बिअंतसिंग आणि पोलिसप्रमुख सरदार के. पी. एस. गिल यांनी त्या आधारावर कठोर पाऊले उचलून पंजाब आतंकमुक्त केला. या अभियानात बिअंतसिंगांना प्राण गमवावे लागले, हे खरे आहे. पण, चांगल्या ध्येयासाठी अशी किंमत द्यावीच लागते. जिहादी आतंकवादाच्या संदर्भातही याच प्रकारच्या रणनीतीची गरज आहे. पण त्यासाठी कॉंग्रेस, मायावतीची बसपा, मुलायमसिंग व लालूंचे पक्ष यांनी एकत्र येऊन एक धोरण ठरविले पाहिजे. आज तरी तशी चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे, भारतावर उठलेले हे जिहादी आतंकवादाचे काळे सावट केव्हा दूर होईल हे सांगणे कठिण आहे.
रविवार, दि. ४ एप्रिल २०१०,  दै. तरुण भारत, सोलापूर
Tags:

About author

AMAR PURANIK - I am a Journalist. Working with Maharashtra's well known Marathi Daily newspaper "TARUN BHARAT" Solapur as a Sub-Editor. As well as*"HINDUSTHAN SAMACHAR" Nationwide Multilingual News Services as a Solapur district corrospondent. Marathi Articles written on : Current topics, National Issues, Maharashtra Issues, Solapur Issues, Solapur Industries Development, Hindustani Classical Music, Indian Astrology, Science And Technology, Hinduism, Corruption, Social issues.