News Update :

हिंदू : एक मोठी समस्या आणि आव्हानही

हिंदू : एक मोठी समस्या आणि आव्हानही
‘‘आपल्या देशात हिंदू हीच एक मोठी समस्या आहे’’, असे वाक्य मी उच्चारताच, सभागृहातील श्रोत्यांच्या भुवया ताणल्या गेल्या. दिनांक ११ एप्रिल २०१०ला, राजस्थानातील उदयपूर येथे भाषण करताना, मी, प्रारंभीच, हे वाक्य उच्चारले. तेथे, ‘जन चेतना मंच, राजस्थान’ या संस्थेच्या, स्वर्गीय सुदंरसिंग भंडारी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमात मी बोलत होतो. माझ्या भाषणाचा नियोजित विषय होता, ‘‘राष्ट्र के सामने चुनोतियॉं और समाधान’’, माझे भाषण दुपारच्या सत्रात झाले. सकाळच्या उद्घाटनाच्या सत्रात प्रमुख भाषण प्रसिद्ध पत्रकार पद्मश्री मुजफ्फर हुसैन यांचे झाले. त्यांच्या भाषणाचा विषय होता, ‘‘२१ वी सदी का भारत-’’ मुजफ्फर हुसैन उत्कृष्ट वक्ते आहेत. मी त्यांची अनेक भाषणे ऐकली आहेत. पण उदयपूरचे त्या दिवशीचे भाषण अत्युत्कृष्ट होते. २१ व्या शताब्दीत भारत जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनेल, डॉलरची जागा रुपया घेईल, असे उज्ज्वल भविष्य, त्यांनी आपल्या ओजस्वी भाषणात रंगविले होते. माझ्या भाषणाला, मुजफ्फरसाहेबांच्या भाषणाची पृष्ठभूमी होती.
डॉ. हेडगेवारांचे निदान
मी म्हणालो, उज्ज्वल भविष्याचे अत्यंत मनोहारी चित्र, आपण सकाळी अनुभविले आहे. पण कुणाच्या भरवशावर हे घडून येईल? जमिनीवरची परिस्थिती कशी आहे? ज्या बहुसंख्य हिंदू समाजाच्या भरवशावर हे घडून यावयाचे त्याला आपल्या हिंदूपणाचे भान तरी आहे काय? जातीचे भान आहे; भाषेचेही भान आहे; पंथसंप्रदायाचेही भान आहे; पण ज्या विशाल लोकसमूहाच्या या जाती, या भाषा आणि हे पंथसंप्रदाय आहेत, त्या हिंदू समाजाच्या एकतेचे, एकसंधतेचे, एकरसतेचे, एकात्मतेचे भान आहे काय? मग मी संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या एका भाषणाचे स्मरण करून दिले. मी संघाचा जुना स्वयंसेवक. डॉ. हेडगेवारांची भाषणे ऐकलेला. तेव्हा खूप काही समजत होते, असे नाही. पण काही गोष्टी लक्षात आहेत, त्या काळातील डॉक्टरांचे एक भाषण आठवले.
त्या काळात इंग्रजांचे राज्य होते. इंग्रजी राज्य समाप्त करण्यासाठी आंदोलने सुरू होती. पण मी कधी डॉ. हेडगेवारांना इंग्रजी सत्तेवर आगपाखड करताना ऐकले नाही. ते खूप शांतपणे व साध्या भाषेत विषय प्रतिपादित असत. त्यांना जहाल भाषणे करणे जमत नसे, असे म्हणता येणार नाही. कारण, अशाच एका जहाल भाषणाबद्दल, इंग्रज सरकारने त्यांच्यावर खटला भरला होता व त्याबद्दल त्यांना शिक्षाही झाली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर, त्यांच्या सत्काराची जी सभा नागपुरात झाली, त्यासाठी पं. मोतीलाल नेहरू आणि डॉ. अन्सारी असे कॉंग्रेसचे मोठे पुढारी आले होते. पण मी तरी संघात असे जहाल भाषण त्यांच्या तोंडून ऐकले नाही. उलट, ते एका भाषणात, असे म्हणाल्याचे स्मरते की, इंग्रजी राज्य हे आपल्या अवनतीचे आणि अध:पतनाचे कारण नाही. तो आपल्या अध:पतनाचा परिणाम आहे. डॉक्टरसाहेब अगदी सत्य सांगत होते. अलेक्झांडरपासून तो गझनीच्या व घोरीच्या महमदांपर्यंत, तैमूरलंग बाबरापासून तो नादिरशहापर्यंत, जे जे आक्रमक आले, ते सारे सेना घेऊन आले होते. इंग्रज मात्र सेना घेऊन आले नव्हते. व्यापार करण्यासाठी आले होते. फ्रेंच आणि डचही व्यापारासाठीच आले होते. कारण, भारत संपन्न आणि समृद्ध देश होता. सुवर्णभूमी होता. म्हणून तर परकीयांची आक्रमणे झालीत. चोर, लुटारू, दरोडेखोर श्रीमंतांच्या घरावरच आक्रमण करतात ना! भारत अतिसंपन्न होता म्हणून आक्रमणे होत होती. तो अतिसंपन्न होता म्हणून एवढ्या लांबच्या अंतरावरून युरोपातील व्यापारी कंपन्या येथे आल्या. चाणाक्ष इंग्रजांच्या ध्यानात आले की, येथे व्यापार करण्याची आवश्यकता नाही; राजकीय सत्ताही स्थापन करता येते. हा देश एक आहे, पण येथल्या लोकांना एकदेशीयत्वाची जाण नाही. भान असणेच दूर! म्हटले तर हे एक राष्ट्रही म्हणता येईल, पण एकराष्ट्रीयत्वाची भावना नाही. त्यांनी इथल्याच लोकांना आपले सैनिक बनविले आणि त्यांच्याकडून स्वत:चे राज्य स्थापन केले आणि त्यांच्याचकडून ते दीडशे वर्षे चालविले.
अध:पतनाची उदाहरणे
भाषणाच्या ओघात मी जालियानवाला बागेतील घटनेचा संदर्भ दिला. मी ते स्थान दोनदा बघितले आहे. तेथील गाईड, इंग्रजांनी केलेल्या बेछूट गोळीबाराचे वर्णन करतो. त्यांनी मारलेल्या गोळ्यांच्या ज्या खुणा, तेथील भिंतींवर अजूनही दिसतात, त्या दाखवितो. ते बघताना, माझ्या मनात प्रश्‍न आला की, इंग्रज सैनिकांनी या गोळ्या झाडल्या होत्या काय? आज्ञा देणारा अधिकारी इंग्रज होता. पण गोळीबार करणारे? - ते तर आपणच होतो! मारणारेही आपण आणि मरणारेही आपणच! हे तर वेतनभोगी सामान्य सैनिक! पण मोठमोठ्या पराक्रमी पुरुषांचीही तीच कहाणी आहे. राणाप्रतापाविरुद्ध राजा मानसिंग! दोघेही हिंदूच! औरंगजेबाच्या वतीने शिवाजी महाराजांचे पारिपत्य करावयाला आलेले मिर्झाराजे जयसिंग! मिर्झा राजे धार्मिक पुरुष होते! एकलिंगजीचे भक्त होते! पण नोकरी औरंगजेबाची करीत होते! रघुनाथराव पेशवाही महान पराक्रमी. १७६१ च्या पानिपतच्या युद्धाच्या दोन-तीन वर्षे पूर्वी, त्याने पुण्यावरून जाऊन, अफगाणांना सिंधूच्या पार पिटाळून लावले होते. भीमेकाठच्या तट्टांना सिंधूचे पाणी प्यायला मिळाले, असा त्यांच्या पराक्रमाचा गौरव बखरकारांनी केला आहे म्हणतात! पण या राघोबांना पेशवे बनण्याच्या महत्त्वाकांक्षेने इतके पछाडले, की, ते सारा विवेक विसरून गेले आणि पेशवा बनण्यासाठी इंग्रजांना शरण गेले! इंग्रज त्यांचा मनसुबा पूर्ण करू शकले नाहीत, हा भाग वेगळा! पण आपल्या पुतण्याच्या विरोेधात इंग्रज त्यांना जवळचा वाटला, आणि पुतण्या परका वाटला, हे केवढे अध:पतन!  डॉ. हेडगेवारांचा रोष या अध:पतनाकडे होता.
थोर-थोर लोकांना कधी वाटलेच नाही की, आपण सर्वांनी मिळून या देशाच्या शत्रूचा मुकाबला करावा! १७६१ ला मराठे, मोठ्या आत्मविश्‍वासाने अफगाण आक्रमकाच्या विरुद्ध पानिपतला गेले. पण घेतले काय त्यांनी रजपुतांना आपल्या बरोबर? शिखांना? नाव नको! अफगाण आक्रमकांशी ग्वाल्हेरचे शिंदे हिरीरीने लढत होते, तर इंदूरचे होळकर उदासीन होते! इंग्रज पेशव्यांशी लढत होते, तर भोसले, होळकर, शिंदे, गायकवाड तटस्थ होते! इंग्रजांनी मग एकेकाला नामोहरम केले. भोसले शेवटपर्यंत लढले म्हणून त्यांचे राज्य बरखास्त करण्यात आले. होळकर, शिंदे, गायकवाड यांनी इंग्रजांशी जुळवून घेतले, म्हणून ते ‘संस्थानिक’ बनून राहिले. ‘संस्थानिक’ म्हणजे इंग्रजांचे मांडलिक! इंग्रजांनी एवढा मोठा देश सहजपण जिंकला, हे केवढे आश्‍चर्य! जगन्मान्य सात आश्‍चर्यांहूनही अधिक आश्‍चर्यकारक!
शक्तीचा आधार : हिंदूंचे ऐक्य
म्हणून डॉक्टर हेडगेवार म्हणाले की, आपल्या अवनतीला आपण म्हणजे हिंदूच जबाबदार आहोत; आणि म्हणून आपल्या उन्नतीची जबाबदारीही आपलीच. म्हणूनच त्यांनी हिंदूंच्या संघटनेचे कार्य स्वीकारले. त्या कार्यासाठी आपल्या बलदंड शरीराची आहुती दिली. त्यांनी सांगितले की, सारे हिंदू एक आहेत, हा देश त्यांचा आहे म्हणून याचे नाव ‘हिंदुस्थान’ आहे. राष्ट्र समाजाचे बनत असते;  केवळ भूगोलाचे नाही; म्हणून ते म्हणाले की, ‘हिंदू’ म्हणजे हिंदू राष्ट्र. आपल्या संस्थेचे नाव त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठेवले. जातिपातीचा विचार न करता, सर्वांना एका रांगेत उभे राहणे शिकविले; एका रांगेत, खांद्याला खांदा व पायाला पाय मिळवून चालायला शिकविले आणि मुख्य म्हणजे एका रांगेत बसून जेवायला लावले. कसलीही जबरदस्ती न करता, जातींविरुद्ध जहाल भाषणे न करता, कोणत्याही जातीचा अधिक्षेप न करता! हा त्यांचा संदेश आणि त्यांची ऊर्जा घेऊन २०-२२ वर्षांचे तरुण, पंजाब पासून तामीळनाडूपर्यंत आणि सिंधपासून बंगालपर्यंत गेले. त्यांनी आपल्या मनाला जातिपातीचा, भाषेचा, संप्रदायभेदांचा विचारही शिवू दिला नाही. आपल्या अंत:करणाची उदारता, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रभाव प्रकट करून एक महान् संघटन उभे केले. त्याच शक्तीवर आज समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये ही राष्ट्रभक्त मंडळी कार्य करीत आहेत. हिंदूंचे ऐक्य आणि त्यांच्यात जागृत झालेला राष्ट्रभाव, हा सर्व संघटनांच्या शक्तीचा आधार आहे.
संघाचा ठराव
आज, सत्तेचा मोह बाळगलेल्यांना हिंदू समाजाची एकता भावत नाही. त्या समाजाला तोडण्याचे उद्योग ते करीत आहेत. राघोबादादांना ज्याप्रमाणे, महत्त्वाकांक्षेने आलेल्या अंधत्वापायी आपपरविवेक सुचला नाही, तसेच सत्तेच्या मोहापायी, समाजाच्या एकतेला तडे देण्याच्या क्रियाकलापांची कास धरताना या लोकांना काही वाटत नाही. शेकडो वर्षांच्या काही अनिष्ट रूढी व परंपरांमुळे, काही जातींना आपण अस्पृश्य ठरविले. जंगलात आणि पहाडी प्रदेशांमध्ये राहणार्‍या आपल्याच बंधूंना आपण दूर ठेवले. त्यांना समाजाच्या अन्य घटकांच्या समकक्ष आणण्यासाठी काही सोयी सवलती देणे आवश्यक होते. त्यामुळे, एस. सी. व एस. टी. या समूहात समाविष्ट असलेल्यांकरिता आरक्षणाला सर्वांनी सहमती दिली. या  विशेष आरक्षणाच्या विरोधात, जेव्हा गुजरात आदि प्रांतांमध्ये उग्र आंदोलने सुरू झाली, तेव्हा १९८१ साली, संघाच्या अ. भा. प्रतिनिधिसभेने एक ठराव पारित करून हे आरक्षण चालू असावे, असे सांगितले. त्यानंतर ते आंदोलन शांत झाले. संघाच्या ठरावातील शब्द आणि त्यातून प्रतीत होणारी भावना लक्षात घेतली पाहिजे. ठराव म्हणतो, ‘‘संघ हरिजन आणि जनजातीसहित संपूर्ण हिंदू समाजाला एक आणि अभिन्न मानतो; आणि या ऐक्यभावनेला जागृत ठेवण्यासाठी तो सतत प्रयत्नशील राहिलेला आहे. संघाची ही मान्यता आहे की, शेकडो वर्षांपासून सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्टीने मागासलेल्या या बांधवांना शेष समाजाच्या समकक्ष आणण्यासाठी आरक्षण पद्धतीला सध्या कायम ठेवणे आवश्यक आहे....... परंतु, आता आरक्षण सत्ता व मतांच्या राजकारणाचे ते हत्यार बनले आहे....... आरक्षण ही स्थायी व्यवस्था होऊ शकत नाही.’’
आव्हान आणि संधी
एस. सी. व एस. टी. ला आरक्षण मिळाले, हे बघताच, अन्य मागासवर्गही आरक्षणाची मागणी करू लागले. त्यासाठी मंडल आयोग निर्माण करण्यात आला. ‘अदर बॅकवर्ड क्लासेस’ साठी (ओबीसी) तो आयोग होता. पण त्याचे रूपांतर ‘अदर बॅकवर्ड कास्ट्‌स’ असे झाले आणि जन्माधारित मागासलेपणाची मागणी सुरू झाली. ती आतापर्यंत शैक्षणिक आणि नोकर्‍यांचा क्षेत्रात मर्यादित होती. आता राजकीय क्षेत्रातही ओबीसीसाठी आरक्षण मागणे सुरू झाले आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते आले आहे. त्याने या तथाकथित मागास जातींची किती उन्नती झाली कुणास ठावे, पण आता विधानमंडळे व संसदेसाठीही, ओबीसी आरक्षण मागू लागले आहेत. हिंदू समाज कधीही एकसंध व एकात्म होऊ नये, यासाठीच ही रणनीती आहे. आमचे मित्र गोपीनाथजी मुंडे यांनीही या विभाजक राजनीतीच्या अभियानात सामील व्हावे, हे महान् आश्‍चर्य आहे. राजकीय आरक्षण सुरवातीला केवळ दहा वर्षांसाठी होते. घटनेत वेळोवेळी बदल करून ते आता ७० वर्षांसाठी करण्यात आले आहे. आता, पुढारले बनण्याची आशा आणि जिद्दच संपली आहे. निरंतर मागासले ठरण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे! ही गंभीर गोष्ट आहे. हिंदू समाजाच्या भल्याची काळजी वाहणार्‍या संघासारख्या सामाजिक संघटना, संघप्रेरित राजकीय, धार्मिक, आणि समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणार्‍या संस्थांनी याबाबत पुढाकार घेणे आवश्यक आहे. सत्ता मिळविणे हे एकमात्र लक्ष्य असू शकत नाही. मोगलांचे, किंवा इंग्रजांचे आक्रमण झाले, तेव्हा सत्ताधारी लोक येथे होतेच की नाही? पण समाजाच्या व पर्यायाने राष्ट्राच्या एकतेचे भान सुटल्यामुळे, सुमारे सातशे वर्षे, या देशाला गुलामी भोगावी लागली. या इतिहासापासून आपण शिकले पाहिजे. जे इतिहास विसरतात, ते आपला भविष्यकाळ धोक्यात आणीत असतात, हे एक अनुभवसिद्ध, शाश्वत, जागतिक सत्य आहे.
सारांश असा की, आपल्या हिंदूपणाचे भान जागे करण्याची ही मूलभूत समस्या आहे; आणि ते एक फार मोठे आव्हानही आहे. आर्थिक निकषावर मागासलेपण ठरविले, तर खर्‍या मागासलेल्यांचेही कल्याण होईल आणि समाजालाही तडे जाणार नाहीत. पण हा विवेक, सत्तेच्या मोहाची झापडे लावून अंधत्व स्वीकारलेल्यांना सुचेल? देशाच्या व राष्ट्राच्या कल्याणासाठी, तो सुचणे नितांत आवश्यक आहे. अन्यथा इंग्रजांच्या आगमनापूर्वीची स्थिती आपण निर्माण करू. हिंदुत्वाला आपला आत्मा मानणार्‍या पक्षासाठीही हे मोठे आव्हान आहे. जसे आव्हान, तशीच संधीही.
मुख्य प्रवाहाशी जोडणे
येथे हेही लक्षात घेतले पाहिजे की, हे काम हिंदूंनाच करावयाचे आहे. हिंदूविरोधी शक्तींना, हिंदू समाज आपापसात भांडत राहिला, तो विघटित होत राहिला, तर आनंदच होईल. तो संघटित झाला, तर आणि तरच हिंदूंपासून, इतिहासकाळात दूर गेलेले समाजही हिंदूंच्या जवळ येतील. हिंदू हा मुख्य राष्ट्रीय प्रवाह असल्यामुळे, त्याच्याशी ते संलग्न होतील.  त्यांंना त्या प्रवाहाशी संलग्न करणे, ही जशी समस्या आहे, तसेच ते आव्हानही आहे. परंतु, हे समाज, स्पष्ट बोलायचे म्हणजे मुस्लिम व ख्रिस्ती समाज, यांना मुख्य प्रवाहाशी जोडण्याच्या प्रयत्नांऐवजी, त्याचे वेगळेपण जोपासण्याचीच नीती अवलंबिली जात आहे. मुसलमानांना आरक्षण द्यावे, अशी मागणी येत आहे. महिलांच्या आरक्षणात, मुस्लिम व ख्रिस्ती यांनाही आरक्षण द्यावे, ही मागणी, मुसलमान व ख्रिस्ती पुढार्‍यांनी केली असती, तर ती आपण समजूनही घेऊ शकलो असतो. पण ही मागणी करणारे हिंदू आहेत. मुलायमसिंग, लालूप्रसाद, अर्जुनसिंग हे हिंदू आहेत. एकदा का महिलांच्या संदर्भात कोटा मिळाला की मग सर्वसाधारण क्षेत्रांतही कोटा मागणे सोपे जाईल, हा त्यांचा हिशेब आहे. सैन्यातही मुसलमानांचा कोटा असावा हे सांगणारे न्या. मू. सच्चर हिंदू आहेत, मुसलमानांना शिक्षण संस्थांमध्ये आणि नोकर्‍यांत आरक्षण द्यावे हे सुचविणारे न्या. मू. रंगनाथ मिश्र हिंदू आहेत. १९२० पासून १९४७ पर्यंत मुसलमानांचे वेगळेपण जोपासण्याच्या धोरणाची परिणती मातृभूमीच्या विभाजनात झाली, हे सत्य ढळढळीत दिसत असतानाही, तीच वाट धरली जात आहे; आणि या वाटेचा आग्रह धरणारे हिंदू आहेत. मग, मौलिक समस्या कुणाची? हिंदूंचीच की नाही? भाजपा स्वतःला हिंदुत्वनिष्ठ राजकीय पक्ष मानते. मग तिथे अल्पसंख्यक मोर्चा का असावा? धर्म बदलला की तो अल्पसंख्य होतो काय? त्याने जाति-आधारित राजकीय आरक्षणाचाही ठामपणे विरोध करायला हवा. मुस्लिम व ख्रिस्ती बांधव मुख्य राष्ट्रीय प्रवाहाकडे कसे वळतील, इकडे त्यांचे ध्यान असले पाहिजे. संपूर्ण नागरी कायदा सोडा, पण निदान विवाह व घटस्फोट या बाबतीत सर्वांसाठी समान कायदा राहील, अशी खटपट सुरू केली पाहिजे. एक स्वतःचा अनुभव सांगतो. सुमारे सहा महिन्यांपूर्वी मी भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे, समान विवाह व घटस्फोट यासंबंधीच्या कायद्याचे प्रारूप पाठविले होते. मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री. रत्नपारखी यांनी परिश्रमपूर्वक हे प्रारूप तयार केलेले आहे. सहा मुख्यमंत्र्यांपैकी तिघांनी, तर त्याची साधी पोचही दिली नाही. एकाने एका ओळीची पोच दिली. एका मुख्यमंत्र्याने मात्र हा मसुदा आपल्या विधिविभागाकडे पाठवीत असल्याचे कळविले. आणि एकाने मला प्रत्यक्ष चर्चेसाठी बोलाविले. गेल्या १७ फेब्रुवारीला मी त्यांना भेटून आलो. विवाहासंबंधी समान कायदा, हा आपल्या घटनेने सांगितलेला कार्यक्रम आहे. सर्व राजकीय पक्षांनी तो उचलून धरायला हवा. पण मतपेटीचे राजकारण त्यांना तसे करू देत नाही; आणि या सर्व पक्षांचे प्रमुख नेते हिंदू आहेत!
विजिगीषेचा अभाव
विजयाच्या आकांक्षेचा अभाव, ही आपल्या हिंदू समाजाची खास समस्या आहे. हिंदूंना विजयाची अभिलाषा का नसते हे कळत नाही. आपले रामकृष्णादि अवतारी पुरुष विजयशाली होते. त्यांचे अनुकरण त्यांचे भक्त का करीत नाहीत? जो आपल्यावर आक्रमण करतो, त्याला आपण धडा शिकवायला का गांगरतो, हे काही कळत नाही. १४-१५ ऑगस्टला फाळणी झाली. आपल्या नेतृत्वाने ती मान्य केली. ठीक आहे. पण पाकिस्तानने, आगळीक करून, काश्मीरवर आक्रमण केले. त्याला आपण सर्वंकष उत्तर का दिले नाही? आपले सैन्य शौर्याने लढून ते आक्रमण परतवीत असताना, पं. नेहरूंनी ती विजयी वाटचाल मध्येच रोखली. कोण होते, पं. नेहरू? हिंदू! त्यानंतर १९६५ मध्ये व १९७१ मध्ये पाकिस्तानने युद्ध उकरून काढले. १९७१ साली, त्याचा सपशेल पराभव झाला. पाकिस्तान तुटले. त्याचे ९२००० सैनिक आपले कैदी बनले. या स्थितीचा फायदा घेऊन, काश्मीरसकट पाकिस्तानशी वाद असलेले सारे प्रश्‍न आपण का सोडवू शकलो नाहीत? माझे उत्तर आहे विजयाच्या आकांक्षेचा अभाव. माझ्या या मताशी, तत्कालीन प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांचे प्रधान सचिव पी. एन. धर सहमत आहेत. भुत्तो-इंदिरा यांच्यातील सिमला वाटाघाटीच्या वेळी श्री धर तेथे उपस्थित होते. ते लिहितात- "It seemed to me that Bhutto and Aziz Ahmed tried in a carefully calibrated manner to put the Indian team on the defensive. Strange as this may sound the Indian team did not seem very comfortable with the fact of having won the war. I have tried to understand the psychology behind this attitude without success. Perhaps it was Indira Gandhi's view- namely that it would be unbecoming for us to behave victoriously while hosting the summit- that infected our attitude. Or perhaps our collective historical experience makes us feel more at home with set backs.'' (Indira Gandhi: The Emergency and Indian Democracy- page 203)
भावार्थ- ‘‘माझ्या हे ध्यानात आले की, भुत्तो आणि अजीझ अहमद, यांनी अत्यंत काळजीपूर्वक आखणी करून भारतीय चमूला बचावाच्या पवित्र्यात आणले. याचे आश्‍चर्य वाटेल, पण भारतीय चमूला युद्ध जिंकल्याच्या घटनेने सुख झाल्याचे जाणवले नाही. यामागची मनोवृत्ती समजून घेण्याचा मी प्रयत्न केला, पण मला यश मिळाले नाही. कदाचित, आपण विजेतेपणाच्या भावनेने वागणे योग्य नव्हे, असे इंदिरा गांधींना वाटले असावे. कारण शिखर परिषदेत त्या यजमान होत्या, अथवा इतिहासातील आपला अनुभव आपल्याला पराभवच बरा वाटत असावा, असे सांगत असेल.’’ माझ्या मनात विचार आला, पाकिस्तान जिंकले असते, आणि आपले ९२ हजार फौजी त्यांच्या कैदेत असते, तर त्याच्या नेत्यांची वर्तणूक कशी राहिली असती? विजिगीषू वृत्तीच्या अभावामुळे, कारगीललाही आपण फक्त बचाव करण्यात धन्यता मानली. अतिक्रमण करणार्‍या शत्रूचा, त्याच्या प्रदेशात जाऊन, पाठलाग करण्याचे आपल्या मनातही आले नाही. का? पुन: तोच प्रश्‍न आणि तेच उत्तर. विजयाच्या इच्छेचा अभाव!
तात्पर्य, असे की, आपल्या या हिंदुस्थान नावाच्या देशात, हिंदू हीच एक मोठी समस्या आहे. त्यांना आपल्या सामाजिक एकतेचे, एकसंधतेचे, एकात्मतेचे व एकरसतेचे महत्त्व समजावून भान आणून देणे व ते भान समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रांतील व्यवहारात प्रकट करणे, हे सर्वात मोठे आव्हान आहे. आणि दुसरे आव्हान आहे, पराभवाशी जुळवून घेण्याची मानसिकता बदलवून तिला विजयोन्मुख बनविणे. ८५ कोटी हिंदूंमधील ८० टक्के लोकांची म्हणजे सुमारे ६५ कोटी हिंदूंची ही मानसिकता बनली, तर हिंदूंमध्ये फूट पाडणारी सारी कारस्थाने बंद पडतील. मुलायमसिंग, लालूप्रसाद, दिग्विजयसिंग  प्रभृतींची अक्कल ठिकाणावर येईल आणि गोपीनाथजींनाही मग भुजबळांच्या मांडीशी मांडी लावून बसण्याचा संकोच होईल. हिंदूंची ही राष्ट्रीय शक्ती उभी झाली की, आज हिंदूंपासून दुरावा जपणारे लोकसमूह त्याच्याजवळ येतील. मग येथे ना जिहादी आतंकवाद चालेल, ना नक्षली आतंकवाद. तेव्हा राष्ट्र खर्‍या अर्थाने बलशाली होईल. या बलाच्या अभावी आर्थिक समृद्धी, नाना प्रकारच्या आक्रमणांना आमंत्रण देणारी ठरू शकते; आणि देशवासीयांना ऐषआरामाची व चंगळवादाची दीक्षा देणारीही ठरू शकते. म्हणून संपत्तीबरोबर संस्कृती आणि सुरक्षाही आवश्यक असते.
रविवार, दि. १८ एप्रिल २०१०, दै. तरुण भारत, सोलापूर.
............................................................................................................
Tags:

About author

AMAR PURANIK - I am a Journalist. Working with Maharashtra's well known Marathi Daily newspaper "TARUN BHARAT" Solapur as a Sub-Editor. As well as*"HINDUSTHAN SAMACHAR" Nationwide Multilingual News Services as a Solapur district corrospondent. Marathi Articles written on : Current topics, National Issues, Maharashtra Issues, Solapur Issues, Solapur Industries Development, Hindustani Classical Music, Indian Astrology, Science And Technology, Hinduism, Corruption, Social issues.