‘कातळमनीचा ठाव’ : हृदयाचा ठाव घेणारे लिखाण
·अमर पुराणिक
आनंद देशपांडे एक शिवरायभक्त, उदयोन्मुख लेखक, ज्यांचे लेखन त्यांच्या वयापेक्षा २० वर्षांनी प्रगल्भ आहे. ज्यांच्यावर गो.नी. दांडेकर व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे अशा दिग्गजांचे संस्कार झाले आहेत. १ जून २००९ रोजी गो.नी. दांडेकरांच्या पुण्यतिथीदिनी आनंद देशापांडे यांच्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन गोनीदांच्या कन्या व जावयांच्या हस्ते झाले होते. प्रकाशक पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी त्याचदिवशी ‘कातळमनीचा ठाव’ या दुसर्या पुस्तकाच्या प्रकाशनाची घोषणाही केली होती. पहिल्या पुस्तकाच्या यशस्वी प्रकाशनानंतर केवळ चारच महिन्यांत ‘कातळमनीचा ठाव’ हे दुसरे पुस्तक ३ ऑक्टोबर रोजी प्रकाशित होत आहे. दै.तरुण भारतचे माजी संपादक व विद्यमान अध्यक्ष विवेक घळसासी यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे.
‘कातळमनीचा ठाव’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील किल्ले, विशेषत: रायगडाच्या पर्यटनाचा आनंद स्वत: आनंद देशपांडे यांनी अनुभवला आणि तेच अनुभव दै. सोलापूर तरुण भारतमधून पर्यटन व भटकंती विषयक लेखमालिकेच्या माध्यमातून प्रकाशित केले. आता महाराष्ट्रातील दुर्गप्रेमी वाचकांना हे लेखन पुस्तक स्वरूपात वाचता येणार आहे. शिवरायप्रेमींना ही एक अद्वितीय पर्वणीच आहे!
आनंद देशपांडे हे गाढे शिवभक्त, शिवरायांचा वावर जेथे जेथे झाला, तेथे तेथे प्रत्यक्ष अनेकवेळा जाऊन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाखाली किल्ले पर्यटन करून आपले चित्तथरारक व अंतर्मुख करणारे अनुभव ‘कातळमनीचा ठाव’ या पुस्तकातून नेमक्या व प्रभावी शब्दांत टिपले आहेत. या पुस्तकावर बाबासाहेब पुरंदरे व गो.नी. दांडेकरांच्या लेखनाचा प्रभाव जाणवतो. ते या दोन्ही दिग्गजांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शिष्यच असल्याने असे होणे स्वाभाविकच आहे, पण स्वत: आनंद देशपांडेही त्यात प्रभावीपणे प्रकट होतात. ‘कातळमनीचा ठाव’ वाचल्यानंतर एक गोष्ट ध्यानात येते, ती म्हणजे आनंद देशपांडे हे निसर्गाशी संवाद साधणारे आणि निसर्गाच्या गूढ अंतरंगात डोकावून आपले कल्पक विचार अतिशय प्रभावीपणे मंाडणारे लेखक असल्याची प्रचिती वाचकांना आल्याशिवाय राहात नाही. या पुस्तकातील बरेचसे अनुभव व प्रसंग थेट वाचकांच्या काळजाला हात घालतात. आनंद देशपांडे स्वत: मी कोणी मोठा लेखक नसल्याचे म्हणतात, पण त्यांचेच लिखाण त्यांचे हे विधान खोडून टाकते. कदाचित त्यांच्यातला हा विनय असावा.
३० प्रकरणांतून केलेले किल्लेवर्णन वाचताना प्रत्येक वाचकाच्या अंगात वीरश्री संचारेल यात शंकाच नाही! मला हे पुस्तक वाचताना सर्वात भावली ती ‘गढ मे गढ रायगढ’ व ‘आता सुखाने मरेन’ ही दोन प्रकरणे आणि त्यातील ७३ वर्षीय बंगाली ग्रहस्थ सोमदत्त चट्टोपाध्याय हे व्यक्तिमत्त्व. पोक्त, वैचारिक बैठक असणारे, हिंदूंच्या व विशेषत: मराठी माणसाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे हे दादा व्यक्तिमत्त्व आनंद देशपांडे यांनी फारच प्रभावीपणे उभे केले आहे.
भिषोण सुंदर - अशी खास बंगाली ढंगात सोमदत्त चट्टोपाध्याय यांनी दिलेली गडाच्या सौंदर्यावर अर्थपूर्ण प्रतिक्रिया बरेच काही सांगून जाते. हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब असणारे सोमदत्तदां ‘मुझे कुछ नही होगा’ असे म्हणत कोलकात्याहून शिवप्रेम, हिंदुत्वप्रेमापायी रायगड पाहायला आले होते. ७३ वर्षीय बंगाली सोमदत्तदांची जिद्द व श्रद्धाभाव विलक्षण वाटतो आणि आपण मराठी माणसे मात्र येथल्या येथे रायगडही पाहत नाही, हा आपल्या वागण्यातला विरोधाभास आनंद देशपांडेंनी अगदी पोटतिडकीने मांडलाय. शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर सोमदत्तदांचे ध्यान लागणे शिवरायांचे योगीत्व स्पष्ट करते आणि ‘आज मेरा जीवन सफल हो गया, रायगढ देख लिया, अब चैनसे मरूंगा’ चा त्यांचा सार्थक भाव वैराग्य व तृप्ती दर्शवितो. शिवरायांना ‘योद्धा योगी’ का म्हटले जाते, त्याचे उत्तर देशपांडे यांनी येथे दाखवून दिले आहे.
‘उत्तर का इतिहास समझौतोंका इतिहास है| दख्खन का इतिहास जो इतिहास शिवछत्रपतीने निर्माण किया, वह संघर्षोंका इतिहास है’ याचे नेमक्या शब्दांत सोमदत्तदांद्वारे केलेल हे वर्णन आनंद देशपांडेंनी प्रभावीपणे व्यक्त करीत नेमकी भेदकता साधली आहे.
‘सुनो आनंद, मेरी एक बात ध्यान मे रख्खो, सही मायने मे अगर जीवन का अर्थ समझना चाहते हो, तो बेचैनी में जिओ और चैनसे मरो|’ हा सोमदत्तदांचा अनुभवाचा सल्ला आपणा वाचकांनाही जगण्याची नवी ऊर्मी व दिशा दाखवतो. इतिहास संरक्षण ऐतिहासिक स्थळ संरक्षणाबाबत आनंद देशपांडे यांनी सणसणीत ताशेरेच ओढले आहेत व महाराष्ट्रीयांची शिवाजी महाराजांबद्दल असलेली बेगडी आस्था, मान खाली घालायला लावणारी असल्याचे त्यांनी आत्मपरीक्षणाच्या दृष्टीने योग्यरीतीने मांडली आहे.
‘रायगडावरील धुकेजलेला पाऊस’ या पहिल्या प्रकरणात पावसाळ्यातील रायगडाचे निसर्गवर्णन सृष्टिदेवतेच्या दिव्य स्वरूपाची प्रचिती देते आणि तेथील चित्तथरारक अनुभवांचे वर्णन शिवरायांच्या काळातील प्रतिकूल परिस्थितीची चुणूक दाखविते. दर्या, खोरे, घाट आदी रायगड परिसराचे आनंद देशपांडे यांनी केलेले लालित्यपूर्ण सुंदर वर्णन आपल्यात एकदातरी गड पाहण्याची तीव्र इच्छा निर्माण करते.
‘शिवथरघळीची निसरडी वाट’मध्ये समर्थ रामदास स्वामींनी दासबोध लिहिलेल्या स्थानाचे यथोचित वर्णन, वैराग्यसंपन्न वातावरणनिर्मिती झाल्याचा अनुभव वाचकांना देते.
तिसर्या लेखांकातील प्रतापगडाचे वर्णन आणि लेखकाच्या बहिणीवर पडलेला शिवचरित्राचा प्रभाव व श्रद्धा यामुळे स्वत:च्या सुरक्षिततेबद्दलचा प्रचंड आत्मविश्वास, आपल्यातही आत्मविश्वास निर्माण करतो. ‘हिरवा हिरवा घाट’ हे प्रकरण आपल्याला निसर्गाविषयी जागृत करते, तसेच ‘वृक्षायन’मधील निसर्गसंगोपन व वृक्षमहिमा वाचकांत पर्यावरणाच्या असंतुलनाच्या परिणामांची नव्याने जाणीव करून देते. ‘भग्न भुलेश्वर’मध्ये सोलापूर-पुणे मार्गावरील महादेेवाचे भव्य व प्राचिन मंदिर, सुंदर कोरीवकामांचा उत्कृष्ट नमुना असल्याचे देशपांडे म्हणतात आणि भग्नावस्थेतील या मंदिरातील अवशेष पाहून मुस्लिम धमार्ंध राजवटीची क्रूर कृत्ये पाहून लेखकाच्या मनात काय त्वेष निर्माण झाला असेल, याची कल्पना येते.
शिवकालीन किंवा एकूणच सर्व इतिहासकालीन संपत्ती जपण्याबाबत शासन उदासीन आहे. शिवरायांच्या दिग्विजयी पुरुषार्थाला वाट चुकलेला देशभक्त म्हणणारे नपुंसक सर्वधर्मवादी राजकीय नेत्यांच्यावरही लेखकाने आसूड ओढले आहेत. छत्रपती शंभुराजांचे जन्मस्थान पुरंदर गडाची अतिशय दुरवस्था पाहूनही हेच जाणवते. नेत्यांची घरे राष्ट्रीय स्मारकाच्या नावाखाली जपण्यात व्यर्थ पैसा खर्च करतात, पण या प्राचीन इतिहासाकडे कोणालाही बघायला वेळ नाही, याची आनंद देशपांडे यांना वाटणारी खंत वाचकांनाही चिंता करायला लावते.
आयुर्वेदिक वनौषधी, शतकानुशतके निसर्गाकडे दुर्लक्षाचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागणार आहेत. झाडे तोडताना तिशीतला लाकूडतोड्या आणि साठीची वसंताची आई दोन भिन्न प्रवृत्तीची माणसे एकाच ठिकाणी, एकाच वेळी पाहिल्यावर लेखकाच्या मनात निर्माण झालेली अस्वस्थता जाणवते.
‘किल्ले भ्रमंतीबरोबरच निसर्गाचं संतुलन राखा, निसर्ग वाचवा!’ हाच संदेश लेखक आनंद देशपांडे यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून दिला आहे. आनंद देशपांडे यांचे सकस लिखाण आपल्याला काहीतरी वेगळे आणि चांगले वाचल्याचे समाधान नक्कीच देईल, यात शंका नाही!
दै. तरुण भारत, सोलापूर.

संस्कृतीची जपणूक, संवर्धन गरजेचे : पं. नयन घोष
नयन घोष यांच्या बहारदार तबलावादनाने सोलापूरकर मंत्रमुग्ध
•अमर पुराणिक
सोलापूर, :- आपण भारतीय संस्कृती विसरत चाललो असून, आपण आपल्या संस्कृतीची जपणूक व संवर्धन करणे आता गरजेचे झाले आहे. कारण, भविष्यात आपल्याला आपलेच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत व संस्कृती शिकण्यासाठी युरोप किंवा अमेरिकेत जायची वेळ येऊ नये, यासाठी आपण प्रत्येक भारतीयांनी आणि विशेषत: प्रसारमाध्यमांनी आपल्या संस्कृतीच्या संवर्धनासाठी योगदान देणे अत्यंत गरजेचे आहे, अशी नम्र विनंती ज्येष्ठ तबला व सतारवादक पंडित नयन घोष यांनी सर्व भारतीयांना व सोलापूरकर रसिकांना केली. जागतिक किर्तीचे तबलावादक पंडित नयन घोष यांच्या अप्रतिम तबलावादनाने आजच्या कार्यक्रमात सोलापूरकरांना मोहवून टाकले. कै. दिगंबरबुवा कुलकर्णी व दत्तात्रय कुलकर्णी यांच्या स्मृत्यर्थ व्यंकटेश संगीत विद्यालयाच्या वतीने सरस्वती मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या संगीत सभेत पं. नयन घोष यांचे तबला वादन झाले. यावेळी पंडित नयन घोष यांचा सत्कार व्यंकटेश संगीत विद्यालयाचे संचालक बाळासाहेब कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना पंडित नयन घोष बोलत होते. पंडित नयन घोष यांनी आपल्या तबला वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.पं. नयन घोष हे भारतातील श्रेष्ठ तबलावादकांपैकी एक असून, त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे, ते जितके अप्रतिम तबला वाजवतात तितक्याच प्रभावीपणे सितारदेखील वाजवतात. तबला आणि सितार अशी दोन्हीही वाद्यं अप्रतिम कौशल्याने वाजवणारे भारतातील ते एकमेव कलावंत आहेत. पं. नयन घोष हे सुप्रसिद्ध तबलावादक पद्मभूषण पंडित निखिल घोष यांचे चिरंजीव असून, सुप्रसिद्ध बासरीवादक पन्नालाल घोष यांचे पुतणे आहेत. अशी समृद्ध परंपरा लाभलेल्या पं. नयन घोष यांनी आजच्या कार्यक्रमात तबल्याचे अभिनव रंग भरले. त्यांनी कार्यक्रमात ‘तीनताल’ सादर केला. त्यांनी सादर केलेल्या तीनतालात पेशकार, मिश्र जातीतील गती व तुकडे पेश केले. तसेच उस्ताद अमीर हुसेन खॉंसाहेब व पंडित ज्ञानप्रकाश घोष यांच्या बंदिशी दमदाररित्या सादर केल्या. पं. घोष यांच्या कसदार, मुलायम व चपळ हाताने सोलापूरकर रसिकांवर अक्षरश: जादू केली. पंडित नयन घोष यांना सारंगीवर संगीत मिश्र यांनी तर संवादिनीवर मुकुंद पंडित यांनी साथ केली...
दै. तरुण भारत, सोलापूर. दि. १० जानेवारी २०११नयन घोष यांच्या बहारदार तबलावादनाने सोलापूरकर मंत्रमुग्ध

महाराष्ट्राची संवादिनी झाली अबोल
संवादिनीशी स्वरसंवाद साधणारे अप्पा जळगांवकर
•अमर पुराणिक
स्वर आणि स्वरसंवादाचे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात अनन्य साधारण महत्त्व आहे. संवादिनी अर्थात हार्मोनियम हे ख्याल, ठुमरी, दादरा आदी गायनशैलींच्या साथीचे वाद्य. अशा संवादिनीशी स्वरसंवाद साधणारी व्यक्ती म्हणजे कै. अप्पा जळगांवकर. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे हा स्वरसंवाद संपल्यासारखे वाटते. अप्पांनी अनेक दिग्गज गायकांना संवादिनीवर साथ करीत त्या गायकांच्या गाण्याला चार चॉंद लावले. अशा या स्वरांच्या गाढ्या अभ्यासकाच्या निधनाने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.अप्पा जळगांवकरांचा जन्म जालन्यातील जळगाव या गावी ४ एप्रिल १९२२ रोजी झाला. त्यांचे बालपणही जालन्यातच गेले. ६२ वर्षांपूर्वी ते पुण्यात आले आणि पुण्यातच स्थाईक झालेे. मुंबई आणि पुणे ही अप्पांच्या आवडीची गावं. संगीत क्षेत्राला अनुकूल अशीच ही दोन्ही गावं असल्याने अप्पांचा जीव येथेच रमला, सात स्वरांची साथ, संगत आणि अभ्यास याशिवाय अप्पांना कधी करमलेच नाही!पुण्यात आल्यावर आप्पांची ओळख संगीत क्षेत्रातील दिग्गजांशी झाली. अप्पा जळगांवकरांनी उस्ताद बडे गुलाम अली खॉं, पंडित कुमार गंधर्व, पं. वसंतराव देशपांडे, पंडित भीमसेन जोशी, जसराज, रोशनआरा बेगम, माणिक वर्मा, किशोरी आमोणकर, गंगुबाई हनगळपासून ते आताच्या पिढीतील पं. मुकुल शिवपुत्र कोमकळ्ळीमठ, राहुल देशपांडे अशा दिग्गज गायकांना अप्पांनी संवादिनीची सुरेल साथ केली होती. पंडित भीमसेन जोशींच्या बहुतांशी मैफलीत ते आपल्या बहारदार हार्मोनियम वादनाने सप्तरंग भरतहोते. किंबहुना अप्पा जळगांवकरांनी भीमसेन जोशींच्या मैफली रंगविल्या म्हटल्यास अतिशयोक्तीचे होणार नाही. गायन, वादन आणि नृत्याच्या कार्यक्रमात साथसंगत करण्याबरोबरच सोलोवादन हेही त्यांच्या वादनाचे खास वैशिष्ट्य होते.मुळात अप्पांची आवड म्हणजे धृपद गायकी. धृपद गायकीच्या मैफलीमध्ये त्यांचे मन रमायचे, पण कर्मधर्म संयोगाने अप्पा संवादिनीवादन करू लागले. त्यांनी बाळकृष्ण चिखलेकर आणि उस्ताद छब्बू खॉं यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले, पण संवादिनी वादनाचे कोणाकडून प्रशिक्षण घेतले नाही. एकलव्याप्रमाणे कठोर रियाज करीत संवादिनी वादनात त्यांनी प्राविण्य प्राप्त केले. अशा स्थितीतच अप्पांनी संवादिनीवादनात स्वतःचे असे अढळ स्थान प्रस्थापित केले. संवादिनी वादनाचे क्षेत्र म्हटल्यानंतर सर्वप्रथम नाव घ्यावे लागेल ते संवादिनी वादनाचे अध्वर्यु गोविंदराव टेबे यांचे. गोविंदरावांच्या पश्चात या क्षेत्रात काही मोजक्या कलावंतांनीच आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले. यात गोविंदराव पटवर्धन, अप्पा जळगांवकर, तुळशीदास बोरकर, पं. ज्ञानप्रकाश घोष, पुरुषोत्तम वालावलकर, महंमद ढोलपुरी, संजय चक्रवर्ती, ज्योती गुहा अशी काही थोडीच नावे नजरेसमोर येतात.संवादिनीवादन हे मुळात गायनाला साथ करणारे वाद्य असल्याने संवादिनी वादकालाही अर्थातच दुय्यम स्थान आहे. त्यामुळे संवादिनी वादकांच्या वादनकौशल्याकडे पाहिले जात नाही. किंबहुना साथसंगत करण्याचा पहिला नियम हा की, साथ करताना आपण ज्या गायक, वादकाला साथ करीत असतो, त्याला ओव्हरटेक करता कामा नये, हाच यातला कायदा आहे. गायक, वादकांना साथ करीत स्वत: संवादिनीने स्वत:च आनंदाने कायम दुय्यमत्व स्वीकारले. जसे संवादिनीने दुय्यमत्व स्वीकारले तसेच संवादिनी वादकांनीही स्वीकारले आणि तेही आनंदाने. अप्पा जळगांवकरांनीही आपल्या वादनात साथसंगतीचा हा उसूल कटाक्षाने पाळला. किंबहुना अप्पांनी साथ संगत करता करताच आपले वेगळेपण व वैशिष्ट्य सिद्ध केले. साथसंगत करीतच आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटविणे तसे अवघडच, पण अप्पांनी हे लीलया करून दाखविले. अप्पा जसे स्वभावाने शांत व संयमी, तसे त्यांचे वादनही संथ व संयमी होते.प्रत्येक घराण्याच्या गायकीची पद्धत वेगळी, प्रत्येक गायकाची गायनशैली वेगळी. कोणत्याही कलाकाराच्या व घराण्याच्या शैलीच्या अनुषंगाने अप्पा साथ करीत असत. आपली जोड त्यात ते कधीही देत नव्हते. कुमार गंधर्वांच्या चपल, परिपूर्ण गायकीला पोषक अशी साथ अप्पा करीत. कुमारांची गायकी म्हणजे विजेसारखी होती. उसळत आरोहण करणार्या व कोसळल्याप्रमाणे अवरोहण करणार्या कुमारांच्या तानांना अप्पा साजेशी साथ करीत असत. जसराजांच्या सौम्य गायकीला तशीच सौम्य साथ करीत. पं. प्रभुदेव सरदारांच्या जयपूर घराण्याच्या बलपेचांच्या आक्रमक, वक्र व अवघड गायकीलाही ते सुंदर साथ करीत. जयपूर घराण्याचे वैशिष्ट्य असलेल्या पं. प्रभुदेव सरदारांच्या गमकयुक्त तानांनाही ते तशीच साथ करीत होते. त्याचप्रमाणे पं. वसंतराव देशपांडे यांच्या भेंडीबाजार घराण्याच्या खंडमेरू पद्धतीच्या गायकीलाही अप्पा त्याच ताकदीने साथ करायचे. पं. भीमसेन जोशींच्या गायकीलाही त्यांच्या किराना गायकीला अनुसरूनच साथ करीत होते. प्रसिद्ध शास्त्रीय नर्तिका रोहिणी भाटे यांच्याही बर्याच कार्यक्रमांत अप्पांनी साथ केली. अप्पा कदाचित याचमुळे गायक, वादकांना प्रिय होते. अप्पांचा लेहर्याचा हात ही अप्रतिम होता आणि लयीवरहीप्रभुत्व होते, परंतु सोलोवादनात मात्र ते आपल्या वादनाचे कौशल्य दाखवीत असत. शुद्ध स्वर, कोमल, तीव्र स्वरांप्रमाणेच मींड, सुत, गमक आदी प्रकार स्वच्छ व स्पष्टपणे अप्पाच्या संवादिनीतून निघत होते. प्रत्येक रागाच्या रागांगाचे वैशिष्ट्यपूर्ण प्रकटीकरण हे ही अप्पांच्या वादनाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. अप्पा कलाकार म्हणून जेवढे मोठे होते, तेवढेच माणूस म्हणूनही मोठे होते. प्रेमळ, मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा मित्रवर्ग फार मोठा होता. अप्पांच्या मित्रवर्गाप्रमाणेच त्यांचा शिष्यवर्गही फार मोठा आहे. त्यांनी अनेक संवादिनीवादक तयार केले. तसेच नव्या ख्याल गायकांपैकी बर्याच जणांना अप्पांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या मोठ्या शिष्यगणांत मुकुंद फडकरी, राहुल देशपांडे ही काही नावाजलेली नावे आहेत. पं. कुमार गंधर्व यांचे चिरंजीव, गुणी व सुप्रसिद्ध गायक पंं. मुकुल शिवपुत्र कोमकळ्ळीमठ हे अप्पा जळगांवकरांचे जावई होत. अप्पांच्या पत्नी शालिनीताई जळगांवकर यांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले होते.
गेली ४० ते ५० वर्षे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल संगीत नाटक अकादमी, आय.टी.सी. संगीत रिसर्च अकादमी यांसारख्या ख्यातनाम संस्थांनी पुरस्कार देऊन अप्पा जळगांवकर यांचा यथोचित गौरव केला आहे. तसेच ‘स्वरविभूषण’ आणि ’स्वर-लय-ताल रत्न पुरस्कारा’नेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. शासनाने मात्र अप्पा जळगांवकरांसारख्या दिग्गजाकडे दुर्लक्ष केले आहे. अप्पांनी भारतात जवळ जवळ सर्व ठिकाणी आपली कला सादर केली आहे, तसेच अमेरिका, युरोप, श्रीलंका, बांगला देश असे अनेक परदेश दौरेही त्यांनी केले होते. त्यांच्या हार्मोनियम वादनाच्या ध्वनिफिती, कॉम्पॅक्ट डिस्क देखील प्रकाशित झालेल्या आहेत. अप्पा जळगांवकरांसारख्या ज्ञानी व गुणी कलावंताच्या जाण्याने हिंदुस्थानी संगीताचे अतोनात नुकसान झाले आहे! अप्पांसारख्या कलावंतांनी आपल्या प्रतिभेने, अभ्यासाने व कष्टाने संगीत क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. आता अप्पांच्या जाण्याने ही पोकळी भरून येेणे अशक्य आहे. आता ‘तानसेनां’ना अप्पांची साथ मिळणार नाही, ‘कानसेनां’ना अप्पांची साथही ऐकता येणार नाही अन् लेहराही ऐकता येणार नाही!
दै. तरुण भारत, सोलापूर. २० सप्टेंबर ०९
क्रांतीची बीजे पेरणारे ज्येष्ठ कवि नारायण सुर्वे कालवश
कष्टकर्यांच्या भावना झाल्या मुक्या
•अमर पुराणिककामगार आहे मी, तळपती तलवार आहे | सारस्वतांनो, थोडासा गुन्हा करणार आहे॥
अशा शब्दांत श्रमिक, कष्टकरी आणि कामगारांच्या वेदना कवितेतून मांडत शब्दाशब्दांतून क्रांतीची बीजे पेरणारे ज्येष्ठ कविवयर्र् नारायण सुर्वे यांनी गोड, गुलाबी भावभावना आणि शृंगार आदी परंपरागत पठडीतून मराठी काव्याला मुक्त करीत रोजच्या जगण्यातील जिते-जागते संघर्षमय वास्तव साध्या आणि थेट शब्दांत मांडणार्या वास्तववादी काव्यरचना करण्याची अजरामर कामगिरी बजावली. कामगार, कष्टकरी, वंचित वर्गांच्या व्यथा आणि वेदनांना धारदार शब्दरूप देणार्या नारायण सुर्वे या थोर कवीच्या जाण्याने कवितेचे ‘ब्रह्म’ लोपल्याची शोकसंवेदना सर्वच स्तरांतून व्यक्त होत आहे. दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दु:खात गेले| हिशेब करतो आहे, आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे ॥
शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली| भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली ॥
हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले | कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले ॥
हरघडी अश्रू वाळविले नाही, पण असेही क्षण आले | तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले ॥
सर्वसामान्यांच्या आयुष्याचे यापेक्षा प्रभावी आणि वास्तववादी वर्णन काय असू शकणार? नारायण सुर्वे स्वत: जे आयुष्य जगले, तेच त्यांच्या काव्यातून प्रगट झाले. कामगार वस्तीत, कामगारांच्या सान्निध्यात, कामगाराचा मुलगा म्हणून आणि कामगार म्हणून जगलेले जीवन अतिशय दाहकपणे मांडणारे असे एकमेवाद्वितीय कवी म्हणजेच फक्त आणि फक्त नारायण सुर्वेच होय!
अपमान, अवहेलना आणि आत्मवंचना यांचीच त्यांना जीवनप्रवासात सोबत. असा माणूस आत्मानुभवातून जे साहित्य प्रसवतो, त्यात ह्या दु:खाचे विदारक दर्शन असणारच असणार! पण त्यांचं वेगळेपण आणि थोरपणही हेच की, त्यांनी या कटुतेचा मळ आपल्या साहित्यात येऊ दिला नाही, उलट आपली आत्मपरता ही कामगारांच्या ‘आम्ही’ या समूहात विलीन करून टाकली आणि समष्टीची वेदना स्वत:ची म्हणून मांडली. कष्ट आणि जगण्यासाठी केलेल्या संघर्षातून सुर्वे यांनी मराठी काव्याला नवा सूर मिळवून दिला. त्यांनी कवितेतून, आपल्या काव्यातून जाती-पातीचा कधीही पुरस्कार केला नाही. मराठी कवितेला सामाजिक भान आणले. झोपडपट्टीपासून विद्यापीठापर्यंत, बुद्धिजीवींपासून ते रसिकांपर्यंत आणि शिक्षितांपासून ते अशिक्षित कामकर्यांपर्यंत त्यांना मान्यता मिळाली. त्यांच्या असंख्य कविता वाचकांच्या मनात नेहमीच घर करून राहतील; कारण त्यांचे काव्य पदोपदी जीवनाचे वास्तव सांगणार्या आहेत आणि या वास्तवाला प्रत्येकाला सामोरे जावेच लागते!नारायण सुर्वे हे स्वत:ला सूर्यकुळातले कवी म्हणायचे. शोषित-कष्टकर्यांचे जग साहित्यात प्रस्थापित करताना त्यांनी सूर्याची प्रतिमा सतत वापरली. या प्रतिमेची नुसती द्वाहीच फिरवली नाही, तर ती प्रस्थापित करण्याचा जिवंत प्रयत्न केला. हे सूर्यतेज साहित्यात आता अधिक प्रखर झाले आहे. सोलापूरचे प्रसिद्ध शाहीर अमर शेख यांनी डफावर कष्टकर्यांच्या भावना प्रभावीपणे प्रकट करीत नारायण सुर्वेंच्या कविता अनेक ठिकाणी सादर केल्या आहेत. कामगार चळवळीतील तुटलेला, फाटलेला माणूस त्यांच्या कवितेमध्ये आला. तो नुसताच कवितेत आला नाही, तर त्या कवितांचा तो नायक होता; त्यामुळे प्रत्येकालाच या कविता आपल्याशा वाटू लागल्या.जन्मत:च ‘अनाथ’ झालेला हा मुलगा गंगाराम कुशाजी सुर्वे यांना सापडला. हे गंगाराम सुर्वे मुंबईच्या इंडिया वुलन मिलमध्ये साचेवाले म्हणून काम करीत आणि त्यांच्या पत्नी काशीबाई या कमला मिलमध्ये काम करीत. या दाम्पत्याने हे सापडलेले मूल घरी आणले आणि सुर्व्यांना नवा जन्म व नारायण हे नाव दिले. सुर्वे यांनी आपल्या या अनाथपणाची नाळ थेट संत कबिरांशी जोडून घेतली होती. कबीरही त्यांच्या मातापित्याला टाकून दिलेल्या अवस्थेत सापडले होते. एका विणकरानेच त्यांचाही प्रतिपाळ केला आणि ‘कबिरा खडा बाजार में लिए लूकाठी हाथ’ असे म्हणत आपले भणंगपण साजरे करीत एक युगविधान करणार्या कवीमध्ये ते परावर्तित झाले. सुर्वे देखील नेहमी आपल्या भाषणात संत कबिरांची साक्ष काढत, पुरावा देत आणि त्यांच्या व आपल्या अनाथपणाचा एकत्रित उल्लेख करीत साम्यभाव प्रकट करीत. नारायण सुर्वे यांनी संतकवीच्या भाषेत साम्यवादी विचारांची कविता लिहिली. आपले क्रांतिकारी विचार त्यांनी तुकाराम आणि सावता माळी यांच्याप्रमाणे सोप्या व बोलीभाषेत प्रभावीपणे मांडले. जीवनभर अनुभवलेले दु:ख आणि आसपासची परिस्थिती त्यांनी
‘ना घर होते, ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती|
दुकानांचे आडोसे होते, मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती ॥
अशा देण्यात आलेल्या उठवळ आयुष्याची उठबस करता करता|
टोपलीखाली माझ्यासह जग झाकीत दररोज अंधार येत जात होता॥
अशा धाटणीच्या कवितांमधून मांडली आणि ती मराठी मनाला भिडली आणि असे विदारक सत्य मांडत असताना जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी त्यांनी सोडली नाही, हे या पुढच्या ओळीतून प्रखरपणे जाणवते.
त्याच दिवशी मनाच्या एका कोर्या पानावर लिहले, हे नारायणा|
अशा नंग्याच्या दुनियेत चालायची वाट; लक्षात ठेव सगळ्या खाणाखुणा ॥
भेटला हरेक रंगात माणूस, पिता, मित्र, कधी नागवणारा होईन |
रटरटत्या उन्हाच्या डांबरी तव्यावर घेतलेत पायाचे तळवे होरपळवून ॥
तरी का कोण जाणे! माणसा इतका समर्थ सृजनात्मा मला भेटलाच नाही |
आयुष्य पोथीची उलटली सदतीस पाने; वाटते, अजून काही पाहिलेच नाही ॥
नारायण सुर्वे यांनी आपल्या कवितेत विद्रोह अत्यंत साधेपणाने, संयतपणे मांडला. त्याचा उद्रेक किंवा विद्वेष होऊ दिला नाही.मराठी कवितेला स्वप्नरंजनातून सोडवण्याचे मोठे काम मर्ढेकरांनी केले. त्यांच्या आधी केशवसुतांनी ते केले. आधुनिक मराठी कवितेची सुरुवात त्यांच्यापासून होते. त्यांनी मानवी मूल्यांना तात्त्विक बैठक दिली, हे नाकारता येणार नाही. सौंदर्यवादी आणि जीवनवादी असे प्रवाह तेव्हाही साहित्यात होते. जीवनवादी लोक प्रतिभेला दैवी देणगी मानत नाहीत. प्रतिभा ही खडतर जीवनातून अधिक परिपक्व होते, स्वत:कडे आणि समाजसंबंधाकडे डोळसपणे पाहिले तर द्विगुणित होते, ‘ऐसा गा मी ब्रह्मा’ मधल्या त्यांच्या कविता अप्रतिम आहेत. कामगार जाणिवेने भारलेल्या आहेत. साम्यवादी राजकीय बांधिलकी मानणार्या या कवीने शब्दांचा हत्यारासारखा वापर केलेला दिसतो. ‘इथून शब्दांच्या हाती खड्ग मी ठेवीत आलो’, असे ते म्हणतात.
सुर्वे मार्क्सवादी चळवळीतून पुढे आले होते. तरीही कोणतेही लेबल लावून सुर्वेंचा विचार करणे अन्यायकारक ठरेल. लेबलच्या पलीकडचा हा कवी होता. सर्जनशील कलावंताने कोणत्याही विचारसरणीने बांधून घेऊ नये, असेे म्हणतात. त्याप्रमाणे सुर्वेंच्या लेखनाच्या आड ती विचारसरणी आली नाही. तुमची कलाकृती ताकदीची असेल तर ती रसिकप्रिय होते. सुर्वेंची कलाकृती अशीच सशक्त होती. अनुभवातून आलेली ‘लोकमानसा’ची भाषाशैली व व्याकूळ काव्यांच्या बळावर सुर्वे यांनी मराठी काव्याला फार उंचीवर नेऊन ठेवले. मराठी कवितेवर असा अवीट ठसा उमटवणारा सुर्वेंसारखा महान माणूस पुन:पुन्हा जन्म घेत नाही. काव्याची स्वत:ची अशी भाषा असणारा हा कवी व त्यांच्या कविता जिवंत व काळजाला भिडणार्या ठरल्या. सुर्वेंच्या कवितेत प्रचंड प्रतिभा आणि ऋजुता होती. खडबडीत डोहातले पाणी जसे स्पष्ट दिसते, तसे सुर्वेंचे मन काव्यातून दिसते.
कवितेऐवजी रद्दी विकली असती तर बरे झाले असते|
निदान देणेकर्यांचे तगादे तरी चुकविता आले असते॥
असे झाले नाही; आम्ही शब्दांतच इतके नादावलो; बहकलो,
असे झाले नसते तर कदाचित इमलेही बांधले असते॥
त्यांनी स्वत: आयुष्यात इतके चटके खाल्ले, याचा नमुना दाखवणार्या या ओळी आहेत. इतका त्रास सोसला तरी आजुबाजूच्या परिस्थितीविषयी तक्रार केली नाही आणि माणसांचा दुस्वासही केला नाही. विद्रोहींचे साहित्य संमेलन असो वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असो, शांत स्वभावाचे सुर्वे सार्यांच्याच मांडीला मांडी लावून बसू शकत. कोणत्याही विचारांची त्यांना ऍलर्जी नव्हती; त्यामुळेच तथाकथित बंडखोर साहित्यिकांना ते ‘ब्राह्मणाळलेले’ वाटायचे, पण सुर्वेंना त्याची पर्वा नव्हती. कारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वातच सर्वसमावेशकता असल्याने त्यांनी सर्वांना आणि सर्वांनी त्यांना स्वीकारले होते. कामगारांच्या समस्यांत गुंतलेले सुर्वे यांना स्वत:विषयी विचार करायला वेळच मिळाला नसेल, असे नाही. त्यांच्या ‘ऐसा गा मी ब्रह्मा’ कवितेत ‘गलबलून जातो तेव्हा तुझ्याच कुशीत शिरतो’ यासारख्या भावनांना हात घालणार्या ओळी आहेत. त्यांनी स्वत:बद्दलही वारंवार विचार केल्याचे त्यांच्या कवितेतून दिसते, पण हा स्वत:चा विचार त्यांनी एक व्यापक पट समोर ठेवून केल्याचे दिसून येते.गेली जवळपास ५ दशके शब्दांतच नादावलेल्या नारायण सुर्वे नावाच्या फाटक्या इसमाविषयी लिहिण्याची लेखक, पत्रकार मंडळींची ही पहिलीच वेळ नाही, पण त्यामुळेच ते लिहिणे अधिकाधिक कठीण होत चालले आहे. कारण सुर्वे हे नाव आता मराठी माणसाला तर अनोळखी राहिलेले नाहीच, शिवाय देश-परदेशांतील अनेकांनाही या ‘उठवळ’ आयुष्य जगलेल्या कवीविषयी नको तितके माहीत होऊन गेले आहे.
‘माझ्या पहिल्या संपातच, मार्क्स मला असा भेटला,
निवडणुकीच्या मध्यभागी, माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता’॥
अशा आठवणीत दंग होऊन गेलेला हा विद्रोही कवी पुढे यथावकाश मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होऊन प्रस्थापितांच्या मांदियाळीत रुळला आणि त्यानंतर कोकण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी स्वीकारले. पुरस्कारांनी त्यांची पाठ सोडली नाही. ‘भाकरीचा चंद्र शोधण्यातच’ बरबाद झालेल्या सुर्व्यांच्या जिंदगानीची अचूक ओळख महाराष्ट्राबाहेरही पटली होती आणि मध्य प्रदेश सरकारनेही ‘कबीर पुरस्कार’ देऊन त्यांचा सन्मान केला होता. नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानने दिलेल्या ‘जनस्थान पुरस्कारा’मुळे सुर्वे यांच्या उत्तुंग क्षमतेची अधिकच ओळख गडद झाली. कुसुमाग्रजांशी त्यांचे संबंध अगदीच वेगळे आहेत. सुर्व्यांच्या कविता इंग्रजीत अनुवादित होऊन प्रकाशित झाल्या. त्या संग्रहास कुसुमाग्रजांचीच प्रस्तावना होती आणि मुख्य म्हणजे सुर्व्यांच्या प्रतिभेचे सामर्थ्य ज्या अगदी मोजक्याच लोकांनी ही पुरस्कारांची व अध्यक्षपदांची मालिका सुरू होण्यापूर्वीच ओळखले, त्यात कुसुमाग्रज अग्रस्थानी होते. त्यांच्या जाण्याने कामकरी काव्याची उणीव भरून काढणे शक्य नाही. त्यांच्या जाण्याने कामगार, कष्टकरी, साहित्यक्षेत्राचेच नव्हे तर देशाचेही नुकसान झाले आहे. वाचक, चाहते यांच्याप्रमाणेच वयाची ८० वर्षे पार केलेल्या नारायण सुर्वे यांनाही आपल्या कवितेचा रास्त अभिमान होता, म्हणूनच ते म्हणू शकले :
आम्ही नसतो तर हे सूर्यचंद्र, तारे बिच्चारे फिक्के फिक्के असते |
बापहो! तुमच्या व्यथांना शब्दांत अमर कोणी केले असते? ॥
जन्म-मरणाच्या प्रवासात आम्हाशिवाय सोबतीस कोण असते|
चला, बरे झाले! आम्हालाच कवितेत खराब व्हायचे होते ॥•••
दै. तरुण भारत, सोलापूर. २२ ऑगस्ट २०१०
मन्नादांना २००७ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
चित्रपटगीतसृष्टीच्या नभांगणातील तळपणारा तारा : मन्ना डे
•अमर पुराणिकपद्मभूषण मन्ना डे हे हिंदी चित्रपट सृष्टीतील ख्यातकीर्त व्यक्तिमत्त्व. चित्रपट व संगीत क्षेत्रांतील ज्येष्ठ गायक. ज्यांनी हिंदी चित्रपटगीतांना शास्त्रीय गाण्याची बैठक दिली. त्यांच्या भावपूर्ण व शुद्ध गायकीने हिंदुस्थानासह सर्व जगभरातील गानरसिकांना भुरळ घातली. अशा मन्नादांना २००७ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. या आधी पद्मश्री, पद्मभूषण या पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या मन्ना डे यांना आता चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या नावाने दिल्या जाणार्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. हा त्यांच्यासारख्या ज्येष्ठ व श्रेष्ठ पार्श्वगायकांचा सन्मानच आहे! खरे तर यापूर्वीच त्यांना हा पुरस्कार द्यायला हवा होता! माता महामायादेवी व पिता पूर्णचंद्र डे यांच्या पोटी १ मे १९१९ रोजी कोलकात्यात मन्ना डे यांचा जन्म झाला. मन्ना हे त्यांचे टोपणनाव. मन्ना डे यांचे खरे नाव प्रबोधचंद्र डे. त्यांचे शालेय शिक्षण इंदू बाबूर पाठशाळेत झाले. माध्यमिक शिक्षण स्कॉटिश चर्च स्कूल मध्ये झाले, तर विद्यासागर महाविद्यालयातून त्यांनी पदवी संपादन केली. मन्ना डे यांना कुस्ती व बॉक्सिंग या खेळांचीही आवड होती. धार्मिक व एकत्र कुटुंबात जन्मलेल्या मन्नादांच्या घरातच संगीतपरंपरा होती. मन्ना डे यांचे काका संगीताचार्य कृष्णचंद्र डे (ख्यातकीर्त संगीतकार के.सी. डे) यांच्याकडे शालेय जीवनापासूनच शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाला सुरुवात केली. शाळेत आपल्या मित्रांसमोर मन्नादा गाणे गात असत. शाळेत, महाविद्यालयात ते चांगले ‘गवैया’ म्हणून लोकप्रिय झाले होते. काका के. सी. डे यांच्याबरोबरच मन्ना डे यांची उस्ताद डबीर खॉं यांच्याकडेही संगीताची तालीम सुरू होती. १९४१ मध्ये त्यांनी कला शाखेतील पदवीही पूर्ण केली. नंतर के.सी. डे मुंबईला आले व संगीतकार म्हणून नाव कमावले. १९४२ साली मन्ना डे मुंबईला आले व के. सी. डे यांचा सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हिंदी चित्रसृष्टीचे गौरीशंकर सचिनदेव बर्मन यांचेही सहाय्यक म्हणून मन्नादांनी काम करायला सुरुवात केली. त्यावेळी मुंबईत मन्ना डे यांनी भेंडीबाजार घराण्याचे उस्ताद अमान अली खॉं व उस्ताद अब्दुल रहमान खॉं यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण चालू ठेवले. १९४२ मध्ये काका के.सी. डे यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘तमन्ना‘ या चित्रपटात मन्ना डे यांना सर्वप्रथम गायची संधी मिळाली. हे युगलगीत मन्नादांनी सुरैय्यासोबत गायिले. १९४३ मध्ये ‘रामराज्य’ या चित्रपटातही मन्नादा गायिले. ही गीते बर्यापैकी गाजलीही, पण १९५० साली सचिनदेव बर्मनदांनी संगीतबद्ध केलेल्या ‘मशाल’ सिनेमात ‘उपर गगन विशाल’ हे गाणे गायची संधी मिळाली आणि बर्मनदांच्या या गाण्याने मन्ना डे नावाच्या गुणी गायकाची ओळख श्रोत्यांना झाली. हे गाणे प्रचंड गाजले! त्यानंतर प्रसिद्धीसाठी मन्नादांना मागे वळून पाहावेच लागले नाही. १९५२ साली ‘अमर भूपाळी’ हा मराठी व बंगाली भाषेत चित्रपट निघाला, हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला! या चित्रपटात मराठी व बंगालीत सर्वप्रथम मन्ना डे यांनी पार्श्वगायन केले. यातील गाणीही खूप गाजली. त्यांचे बंगाली पार्श्वगायक म्हणून मोठे नाव झाले.दि. १८ डिसेंबर १९५३ रोजी मन्नादांचा विवाह केरळच्या सुलोचना कुमारन यांच्याशी झाला. त्यांना १९ ऑक्टोबर १९५६ साली सुरोमा व २० जून १९५८ साली सुमिता अशी दोन कन्यारत्ने झाली.अतिशय वैविध्यपूर्ण गाणी गाणार्या मन्ना डे यांची ‘रवींद्र’ संगीतावरही चांगली पकड होती. मन्नादांचे शास्त्रीय संगीताबरोबरच पाश्चात्य व लोकसंगीतावरही चांगलेच प्रभुत्व होते. त्यांनी भारतीय व पाश्चात्य संगीतात अनेक नवनवे प्रयोग केले. त्यांनी साडेतीन हजारांहून अधिक गाणी गायिली आहेत. सचिनदांपासून पंचमदांपर्यंत सर्वच संगीतकारांबरोबर मन्ना डे यांनी काम केले. सचिनदा स्वत: धृपद-धमार गायकीच्या परंपरेतले, त्यामुळे शास्त्रीय अंगाची गाणी मन्नादांकडून खूपच सुंदर गाऊन घेतली व जवळ जवळ सर्वच गाणी लोकप्रिय ठरली. सर्वसामान्य रसिक श्रोत्यांना राग दरबारी कान्हडा मन्नादांमुळे कळायला लागला, असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे होणार नाही. मन्नादांनी बरीच गाणी या रागात गायिली आहेत. सचिनदेव बर्मन यांच्या संगीत दिग्दर्शनातली मन्नादांची साधारणपणे सर्व गीते गाजली. ज्यात तलाश, मंजिल, जिंदगी जिंदगी, ज्वारभाटा अशी काही उदाहरणे देता येतील. मन्नादांनी सलील चौधरींसाठी वेगळी गाणी गायिली. अवघड व वक्र चालींची गाणी हे सलीलदांचे वैशिष्ट्य होते. अशी गाणी मन्नादांसारख्या कसलेल्या गायकाच्या आवाजात खूपच शोभतात! जसे ‘‘आनंद, गुड्डी, परिणिता, काबुलीवाला’’ आदी अनेक उदाहरणे सांगता येतील. हेमंतकुमार यांनीही मन्नादांना वैशिष्ट्यपूर्ण गाणी दिली. राहुलदेव बर्मन यांनी मन्नादांकडून खूप वेगळी गाणी गाऊन घेतली. विशेषत: शास्त्रीय संगीत गाणार्या मन्नादांकडून शास्त्रीय संगीताबरोबरच पाश्चात्य ढंगातील गाणी अप्रतिमरीत्या गा ऊन घेतली. हे पंचमदांचे वेगळेपण होते; ज्यात भूतबंगलामधील ‘आवो ट्विस्ट करे’, ‘प्यार करता जा’, पडोसनमधील,‘ एक चतुर नार’, ‘तू क्या जाने पिया सावरिया ’, अब्दुल्लामधील ‘लल्ला अल्ला तेरा’, अधिकारमधील ‘फॅशन की दिवानी’, बहारोंके सपनेमधील ‘चुनरी संभाल गोरी’, बुढ्ढा मिल गयामधील ‘आयो कहॉंसे घन:श्याम नंदलाल’, शोलेमधील ‘ये दोस्ती’, जुर्माना ‘ये सखी राधिके’ तसेच ‘प्यार किये जा, मेहबुबा, सीता और गीता, जाने अन्जाने’ अशी अनेक अवीट गोडीची गाणी मन्नादांनी पंचमदांसाठी गायिली. राज कपूरसाठी मन्ना डे यांनी मेरा नाम जोकर मधील ‘ए भाय, जरा देख के चलो’, सत्यम् शिवम् सुंदरम्मधील ‘यशोमती मैंयासे बोले नंदलाला’ आदी गीते प्रचंड लोकप्रिय ठरली. त्याचबरोबर ‘‘चोरी चोरी, अनाडी, श्री ४२०, बूट पॉलिश’’ आदी चित्रपटांसाठी गीते गायिली. मन्नादांनी या संगीतकारांशिवाय जवळ जवळ त्या काळातील सर्वच संगीतकारांबरोबर काम केले. ज्यामध्ये ‘‘उपकार, वक्त, तीसरी कसम, मेरे हुजूर, नीलकमल, लाल पत्थर, शोर, आविष्कार, क्रांती, लावारिस’’ आदी चित्रपटांचा समावेश होतो. मन्नादांची शास्त्रीय, उपशास्त्रीय गाणी प्रचंड लोकप्रिय झाली! किंबहुना त्यांच्यावर फक्त शास्त्रीय गाणी गाणारा गायक असाच शिक्का पडला होता, पण पंचमदांनी मन्नादांकडून वेगवेगळ्या ढंगांतील गाणी गाऊन घेऊन हा शिक्का पुसला. मन्नादांची बसंत बहारमधील ‘भय भंजना वंंदना’, सूर ना सजे क्या गाऊँ मैं, जाने अन्जानेमधील ‘छम छम बाजे रे पायलिया’, तलाशमधील ‘तेरे नैना तलाश करे’, बूट पॉलिशमधील ‘लपक झपक तू आरे बादरवा’, मेरे हुजूरचे ‘झनक झनक तोरे बाजे पायलिया’ ही शास्त्रीय गाणी आजही लोकप्रिय आहेत. मन्नादांनी नाना पाटेकर यांच्या प्रहार चित्रपटासाठी शेवटचे गीत गायिले आणि चित्रपट गीतगायनातून संन्यास घेतला. आजच्या काळात विशेषत: १९९० नंतर मन्नादांनी चित्रपटगीत गायिलेच नाही. त्यांची यावरील प्रतिक्रिया अतिशय बोलकी होती. त्या दर्जाचे संगीतकार न राहिल्यानेच मन्नादांना संन्यास घ्यावा लागला, पण शास्त्रीय संगीतसाधना आणि जाहीर कार्यक्रम मन्नादांनी अजूनही सुरूच ठेवले आहेत. जवळपास ५० वर्षे मुंबईत घालविल्यानंतर आता मन्नादा सध्या बंगळुरूमधील कल्याणनगरमध्ये राहतात, पण त्यांनी कोलकात्यातील त्यांची जुनी वास्तू तशीच ठेवली आहे. मन्ना डे यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यात १९७० साली ‘निशिपद्म’ या बंगाली चित्रपटासाठी राष्टृीय पुरस्कार मिळाला आहे. तर १९७१ साली मेरा नाम जोकरसाठी राष्ट्रीय पुरस्कार, १९७१ साली भारत सरकारचा पद्मश्री, १९८५ साली मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार, १९८८ साली संस्कृत परिषद, ढाक्का येथील पुरस्कार, १९९० साली मिथुन चक्रवर्ती असोसिएशन, कोलकाता यांचा ‘श्यामल मित्रा’ पुरस्कार, १९९१ ला संगीत स्वर्णांचूर पुरस्कार, १९९३ साली पी.सी. चंद्र पुरस्कार, कमलादेवी राय पुरस्कार, २००१ साली आनंद बाजार पत्रिका यांचा आनंदलोक पुरस्कार, पश्चिम बंगाल सरकारचा उस्ताद अल्लाउद्दिन खॉं पुरस्कार, २००४ साली केरळ सरकारचा पुरस्कार, २००४ सालीच रवींद्रभारती विद्यापीठाची डी.लिट., २००५ साली महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पुरस्कार, २००५ साली बुर्धवन विद्यापीठाची डी.लिट व २००५ साली भारत सरकारचा पद्मविभूषण असे अनेक पुरस्कार व गौरव मन्ना डे यांना प्राप्त झाले आहेत. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरव केल्याने, चित्रपट व संगीत क्षेत्राचीच मान उंचावली आहे!
दै. तरुण भारत, सोलापूर. ४ ऑक्टोबर २००९
आशाताई : एक सृष्टिगांधर्वी
•अमर पुराणिक, सोलापूर.
आशाताईंनी ८ सप्टेंबरला शहात्तरी पार केली, या गोष्टीवर कोणाचा तरी विश्वास बसेल काय? पण याचं रहस्य त्या जादुई आवाजात, चमत्कारात आहे. पाळण्यात असल्यापासून आजपर्यंत आपण आशाताईंचा मखमली आवाज ऐकतो आहोत, हिंदीतही आणि मराठीतही. गेली सदुसष्ठ वर्षं सर्वांनाच आशाताईंच्या आवाजाने वेडं करून टाकलंय. आज आशाताई फक्त देशातच नव्हे तर संपूर्ण विश्वात ख्यातकीर्त आहेत. जेथे जेथे त्यांचा आवाज पोहोचलाय, तेथे तेथे त्यांच्या भावूक आवाजातून भारतीय संस्कृती पोहोचली आहे. धृपदापासून ते ख्यालापर्यंत, ठुमरी-दादर्यापासून गझलांपर्यंत, नाट्यसंगीतापासून ते ठसकेबाज लावणीपर्यंत आणि बालगीतापासून ते पॉप संगीतापर्यंत सर्वच गायनप्रकार त्यांनी लीलया पेलले आहेत. आशाताईंचे गाणे ऐकताना संगीताचे सप्तरंगी इंद्रधनुष्यच त्यांच्या आवाजातून क्षितिजावर फाकल्याची सुखद जाणीव आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. सृष्टीशी नातं सांगणारा आशाताईंचा सर्वरसयुक्त आवाज सृष्टिदेवतेशी नातं सांगतो. आशाताईंच्या स्वराला शास्त्रीय संगीताच्या पक्क्या रियाजामुळे येणारी गोलाई, वजन, जवारी आणि गाज आहे. ही जशी परमेश्वरी कृपा आहे, तसंच ते त्यांच्या कड्या मेहनतीचंही फळ आहे. त्यांचं गाणं ओजस्वी आहे. आशाताईंचं प्रत्येक गाणं उमलत्या फुलाप्रमाणे टवटवीत वाटते. काही वर्षांपूर्वी आशाताईं व उस्ताद अली अकबर खॉं (आशाताई व पंचमदा त्यांना आपले गुरू मानत) यांनी काढलेली ‘लेगसी’ ही ध्वनिफीत ऐकताना याची प्रचिती येते. या ध्वनिफितीत आशाताईंनी ‘ककुभ बिलावल’ रागात ‘होरी’ गायिली आहे, तर ‘अडाणा’, ‘भीमपलास’ व ‘भूप’ रागात तराना गायिला आहे, हा तराना बिदार पद्धतीचा असून, अतिद्रूत लयीत आहे. या तराण्यातून आशाताईंच्या गायकीतील लयीची पक्की बैठक स्पष्ट दिसून येते. ‘गौड सारंग’ रागात होरी मध्यलयीत आहे. या ध्वनिफितीचे वैशिष्ट्य म्हणजे ‘शंकरा भरण’ रागातील धृपद आणि ‘शंकरा करण’ रागातील सादरा. हे दोन्ही राग अतिशय अप्रचलित आहेत आणि आशाताईंसारख्यांनी केलेल्या ‘धृपद-धमारा’चे वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरण हे अवर्णनीय आहे. यातील सर्व हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील वैशिष्ट्यांची आशाताईंनी विलोभनीय मांडणी केली आहे आणि हे करताना या सर्व गायनशैलींचं वेगळेपण काटेकोरपणे जपले आहे. बहुसंख्य रसिक श्रोत्यांना आशाताईंच्या या पैलूंचा विशेष परिचय नाही. आशा, पंचम (आर.डी. बर्मन), किशोरकुमार आणि गीतकार/ कवी गुलजार या चौकडीने दिलेली जवळपास सर्वच गाणी सर्वस्पर्शी, वैविध्यपूर्ण व भावपूर्ण अशीच आहेत. पंचमदा, आशा, किशोरकुमार व गुलजार ही चौकडी म्हणजे हिंदी सिनेसृष्टीला मिळालेले वरदानच होय! पंचमदाने आशाताईंनकडून प्रचंड ताकतीची गाणी गाऊन घेतली. ही गाणी इतरांनी गाण्याचा प्रयत्न करणेही केवळ अशक्य आहे. आशाताईंनी गायिलेली गाणी आपण ऐकलेलीच आहेत. आशाताईं व किशोरकुमारांचा मखमली स्वर, पंचमदांची दमदार संगीतरचना आणि गुलजारसारख्या संवेदनशील कवीचे अर्थपूर्ण काव्य अशा शब्दस्वरांच्या संगमातून निर्माण झालेली कलाकृती म्हणजे अतुलनीयच! अशी सकस व प्रभावी गाणी निर्माण करणे काही येर्यागबाळ्याचे काम नाही! ‘इजाजत, उमराव जान, खुशबू, नमकीन...’ अशी एकापेक्षा एक सरस चित्रपटांची यादी द्यायची म्हटले तर जागा पुरणार नाही. गाणं कुठल्याही प्रकाराचं असूद्यात, त्यानुसार आशाताईंच्या आवाजातला लगाव, बाज आणि सूर प्रकट होतो. मला जाणवलेले विशेष म्हणजे त्या गाण्यातलं नाट्य त्या नेमकं शोधून काढतात आणि त्या जेव्हा गातात तेव्हा ते गाणं त्यांच्या अवघ्या देहातून बोलू लागतं. त्यात भावनांचे इतके पैलू असतात की, ते गाणं पडद्यावर साकारणार्या अभिनेत्रीही ते पैलू प्रकट करायला कमी पडतात, असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे होणार नाही.आशाताई या सर्वसामान्यांच्या घरातील आई किंवा गृहिणीसारख्याच आहेत. त्यांचं वैयक्तिक आयुष्य अतिशय साधे व सर्वसामान्य महिलांसारखेच आहे. संपूर्ण जीवनातलं सुख-दु:ख त्यांनी मोकळेपणानं भोगलंय अगदी विनातक्रार. त्या भोगलेल्या दु:खाच्या छटा त्यांच्या प्रत्येक गाण्यात दिसून येतात. ‘भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले’ या गीतात त्याची प्रचिती येते.आशाताईंना जसा सप्तस्वराला कधीही न ढळणारा ‘पंचम’ भेटतो तसाच, या दु:खात आधार द्यायला त्यांना भेटला ‘पंचमदा’ (आरडी). आशाताई व आर. डी. बर्मन यांचे स्वर संवादाप्रमाणेच हदयाचा संवादही खूप सुंदर जुळल्याचे बर्याच लेखकांच्या लिखाणातून यापूर्वी वाचायला मिळाले आहेत. हे जोडपं अगदी तंतोतंत एकमेकांसाठीच बनलं होतं. या संवादामुळेच कदाचित पंचमदाची संगीतबद्ध केलेली व आशाताईंनी गायिलेली गाणी आत्म्याशी एकरूप झालेली दिसून येतात. भावभावनांच्या विविध छटांच्या माध्यमातून आशाताई प्रत्येकाच्या हदयाशी हितगुज साधतात. आशाताईंचा आवाज आणि गाणे हे इतके एकजीव झालेले असते की, त्यांच्या आवाजाला त्या गाण्यापासून वेगळं काढताच येत नाही. अंगाई, बालगीत, भक्तिगीत, भावगीत, लावण्या, असं कुठलंही गाणं असो, त्यातला भाव त्यांच्या स्वरातून नेमका व्यक्त होतो. आशाताईंनी जवळजवळ १८ ते २० भाषांमध्ये गाणी गायिली आहेत आणि त्या भाषेतल्या गुणवंत व तज्ञ लोकांना ती अतिशय आवडली आहेत. नवख्या भाषेतील गाण्यांचा भावार्थ इतक्या प्रभावीपणे गाण्यातून प्रकट करतात; त्यामुळे त्यांची गायकी हा जगातला मोठा चमत्कार वाटतो! आशाताईंनी आजपर्यंत जवळजवळ हजारो गाणी गायिली आहेत. मला वाटते त्यांनाही हे मोजमाप ठेवता आले नसेल. आशाजींनी ‘चला चला नव बाला’ हे पहिलं मराठी गाणं १९४१ मध्ये गायिलं आणि पहिलं हिंदी गाणं हंसराज बहल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘भैया मुझे ना दे’ हे गीत गायिलं आणि तेथूनच आशाताईंचा चित्रपट संगीताचा प्रवास सुरू झाला. त्यांनी सचिनदेव बर्मन, ओ.पी.नय्यर, आर.डी.बर्मन, सलील चौधरी, जयदेव, खय्यामपासून ए.आर. रेहमानपर्यंत सर्वच संगीतकारांबरोबर काम केले आहे. सिने संगीताबरोबरच त्यांच्या बर्याच ध्वनिमुद्रिकाही प्रकाशित केल्या व त्या प्रचंड लोकप्रिय ठरल्या आहेत. त्यात आरडी, आशा, गुलजारचा ‘दिल पडोसी है’, हरिहरन बरोबर ‘आबशार-ए-गझल’, कशीश, खय्यामबरोबरचा ‘आशा और खय्याम’ गुलामअलीचा ‘मिराझ-ए-गजल’ असे अगणित अल्बम लोकप्रिय ठरले आहेत. मराठी संगीतात सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकरांपासून ते श्रीधर फडके यांच्यापर्यंत ज्येष्ठ, श्रेष्ठ व नवख्या संगीतकारांसाठी आशाताई तितक्याच तन्मयतेने गायिल्या.मराठीतील संगीतकारांनी व कवींनी आपल्या संवेदनशील काव्यांनी मराठी संगीताला एक श्रेष्ठ दर्जा दिला असल्याचे आशाताई म्हणतात. देशात किंवा परदेशात दौर्यावर गेल्या असता एकांतात त्यांनी केलेले कवींच्या काव्यांचे चिंतन त्यांच्या काव्यसमरसतेची प्रचिती देते. आशाताई कविवर्य सुरेश भटांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, आपली कविता मला साक्षात भेटली. अगदी रूबरू. निसर्गसौदर्य पाहून हरखून जाणार्या आशाताई, ‘मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे’, ‘लागुनी थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी’,‘केव्हा तरी पहाटे, चांदण्या रात्री दाखवतात कळ लावणारे दिवे, पुनवेचा पूर पार करून पारिजातकाचा स्पर्श देतात, आकाशात गुणगुणतात मालकंस’, या काव्यांचे भाव जाणून आशाताई म्हणतात की, भटांनी केलेल्या या कविता मानवी स्त्रीच्या नसून सृष्टिदेवतेच्या आहेत. ‘भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले’ या गीताच्या रेकॉर्डिंगच्या वेळी माझी जीवन कहाणी समोरून जात होती, असा आशाताईंनी या गीताबद्दल उल्लेख केला आहे.आशाताई इतरांसाठी खूप करतात, असंही वाचायला मिळालं आहे. खरे तर इतके करण्याची गरज नसतेही, पण दुसर्यासाठी करणे त्यांना प्रचंड आवडते आणि दुसर्यांना खाऊ घालणे तर त्यांना अतिशय प्रिय आहे. अमितकुमार, ऋषी कपूर, डॅनी, मिथुन चक्रवर्ती, गौतम राजाध्यक्ष आदी प्रसिद्ध व्यक्तींनी आशाताईंचा हा पाहुणचार घेऊन त्यांच्यातील सुग्रण पाहिली आहे. ते म्हणतात की, आशाजी गाणे अधिक चांगले गातात की स्वयंपाक जास्त चांगला करतात, हे ठरवणे कठीण आहे! आर.डी. बर्मन यांनी मागे एका दूरचित्रवाणीच्या मुलाखतीत म्हटले होते की, ही आशा सर्वात प्रथम आई आहे आणि नंतर सुग्रण आहे, त्यानंतर पत्नी आहे आणि शेवटी गायिका आहे. आशाताई गेली ६८ वर्षे गातेय. चार पिढ्या त्यांच्या गाण्यावर पोसल्या आहेत. याला केवळ ‘अद्भूत’ हेच विशेषण लावता येऊ शकते. जगातील सर्वोत्कृष्ट १०० अल्बममध्ये ३७ व्या क्रमांकावर विराजमान होण्याचा मान पटकावणार्या आशाताई म्हणजे सृष्टिगांधर्वीच! ऋतूंच्या आवर्तनांची साक्ष असलेला हा स्वर आजही तितकाच ताजा, टवटवीत! दै. तरुण भारत, सोलापूर. आसमंत रविवार दि. १३ सप्टेंबर २००९