News Update :

राहुल के नामपर दे दे बाबा - बाळासाहेबांचे शरसंधान

राहुल के नामपर दे दे बाबा - बाळासाहेबांचे शरसंधान
स्रोत: तरुण भारत 11/16/2011
-
    उत्तर प्रदेशात निवडणूक प्रचाराचा नारळ फेडताना फुलपूर रॅलीत कॉंग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांनी केलेल्या भीक मागण्याच्या व्यक्तव्यावर चारी बाजूंनी टीका होत आहे. त्यामुळे राहुल गांधी सगळीकडून अडचणीत येत आहेत. या व्यक्तव्याच्या विरोधात समाजवादी पक्षाने मुंबईच्या बांद्रा येथील न्यायालयात याविषयी तक्रार नोंदवली असून राहुल गांधीविरुद्ध खटला चालवण्याची मागणी केली आहे.
    उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शुभारंभाचे नारळ फोडताना केलेल्या भाषणात कॉंग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील तरुणांना उद्देशून उद्विग्न सवाल केला होता. किती दिवस महाराष्ट्रात जाऊन भीक मागणार? पंजाबमध्ये जाऊन किती दिवस मोलमजुरी करणार? या राहुल गांधी यांच्या वक्तव्याची दखल घेत, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली आहे.
     ' किती दिवस महाराष्ट्रात जाऊन भीक मागणार ?' असा सवाल करून कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी आपल्या बेअकलेचे चांदतारे तोडले आहेत. राहुलबाबाच्या नव्या व्याख्येनुसार कृपाशंकर सिंग, अबू आझमी यांच्यासारखे बोलभांड मुंबई-महाराष्ट्रातले भिकारीच ठरतात. त्यामुळे त्यांनी आता ' राहुल के नाम पें दे दे बाबा ' असे म्हणत भीक मागत फिरावे, असा मार्मिक चिमटा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काढला आहे.
    राहुल गांधींच्या अकलेची नव्हे तर बेअकलेची तारीफ करावी तेवढी थोडी. कधी काय मुक्ताफळे उधळतील व अकलेचे चांदतारे तोडतील याचा नेम नाही, अशी खिल्ली उडवत उत्तर प्रदेशचा विकास होऊ शकला नसल्यामुळेच तेथील गोरगरीब लोकांवर उपासमारीची, बाहेरच्या राज्यांत जाऊन मोलमजुरी करण्याची, भीक मागण्याची वेळ आली आहे. परंतु उत्तर प्रदेशात सर्वाधिक काळ कॉंग्रेस पक्षानेच राज्य केले व त्यांच्याच राजवटीत उ. प्रदेश सर्वाधिक रसातळाला गेले. तेथील मुख्यमंत्र्यांची नामावली काढली तर त्यात सर्वाधिक मुख्यमंत्री कॉंग्रेसचेच दिसतील. इतकेच कशाला देशावर सर्वाधिक राज्य करणारे पंतप्रधानही उत्तर प्रदेशनेच दिले. खुद्द पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री, व्ही. पी. सिंग असे दिग्गज पंतप्रधान ही कॉंग्रेसचीच देन होती. तरीही उ. प्रदेशच्या लोकांवर भीक मागण्याची वेळ यावी हे युवराजांच्या कॉंग्रेसचेच पाप नाही तर काय? अशी आठवणही ठाकरेंनी राहुल गांधींना करून दिली आहे.
Tags:

About author

AMAR PURANIK - I am a Journalist. Working with Maharashtra's well known Marathi Daily newspaper "TARUN BHARAT" Solapur as a Sub-Editor. As well as*"HINDUSTHAN SAMACHAR" Nationwide Multilingual News Services as a Solapur district corrospondent. Marathi Articles written on : Current topics, National Issues, Maharashtra Issues, Solapur Issues, Solapur Industries Development, Hindustani Classical Music, Indian Astrology, Science And Technology, Hinduism, Corruption, Social issues.